दादर स्थानकावरील प्रचंड गर्दीवर उपाय म्हणून मध्य रेल्वेने परळ टर्मिनसच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली आहे.
मुंबई – दादर स्थानकावरील प्रचंड गर्दीवर उपाय म्हणून मध्य रेल्वेने परळ टर्मिनसच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली आहे. सन २०१५ मध्ये हे टर्मिनस कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने त्यास सन २०१९ची नवीन डेडलाइन देण्यात आली आहे. या टर्मिनससाठी केवळ ५१ कोटींचा खर्च अपेक्षित असून, नियोजित वेळेत परळ टर्मिनस पूर्ण झाले असते तर ही दुर्घटना टळली असती.
मुंबई महानगर वाहतूक प्रकल्प-दोनअंतर्गत सीएसएमटी ते कुर्लामध्ये पाचवी आणि सहावी मार्गिका बांधली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून परळ टर्मिनसला स्थान देण्यात आले आहे. परळ टर्मिनसमधून स्वतंत्रपणे लोकलची वाहतूक शक्य होण्याची योजना आहे. हा प्रकल्प २०१२ मध्ये मांडण्यात आल्यानंतर २०१५मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. परंतु, त्यातील प्रत्यक्ष प्लॅटफॉर्मसाठीचे बांधकाम मार्च २०१७ मध्ये हाती घेण्यात आले. पाच वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर ही दुर्घटना टळली असती, अशी प्रतिक्रिया अधिकारी वर्गांकडून व्यक्त केली जात आहे.
परळ टर्मिनसबाबत कॅगचेही ताशेरे
कॅगच्या जुलैच्या अहवालात रेल्वेच्या प्रलंबित प्रकल्पांविषयी ताशेरे ओढण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील प्रस्तावित ४३ पैकी २६ प्रकल्पांना ठरलेल्या वेळेपेक्षा एक महिना ते ६९ महिन्यांपयर्ंत जास्त कालावधी उलटून गेला आहे, असे कॅगचा अहवाल म्हणतो. गेल्या सहा वर्षात तीन प्रकल्प अपूर्ण असून, १३ प्रकल्पांची मूळ किंमत दोन लाखांपासून २३ कोटींपयर्ंत वाढल्याचे नमूद केले आहे. पश्चिम रेल्वेवरील २१ प्रकल्पांची डेडलाइन चुकली आहे. त्यासाठी सात कोटींहून जास्त किंमत मोजावी लागणार आहे. दरम्यान, परळ टर्मिनसमध्ये सध्याच्या परळ स्थानकातील प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवितानाच पादचारी पुलाची रुंदीही वाढविण्याचाही समावेश आहे. परळ आणि एल्फिन्स्टन रोडला जोडणारा नवीन पादचारी पूलही उभारला जाणार आहे.
महिलेच्या मृतदेहावरील दागिने ओरबाडले
एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मृतांच्या देहावरील सोन्याचे दागिने चोरल्याचा चीड आणणारा प्रकार घडला आहे. शुक्रवारी एलफिन्स्टन दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कांजुरमार्गच्या रहिवासी सुभलता शेट्टी यांच्या मृतदेहावरून सोन्याचे दागिने काही नालायकांनी काढून घेतले. नातेवाइकांनी शुभलता यांचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. दुर्घटनेनंतर समोर आलेल्या काही फोटोंमध्ये एक तरुण सुमलता यांच्या हातातील बांगडय़ा काढून घेताना दिसत आहे. पोलिसांकडून आम्हाला फक्त मोबाईल मिळाला. फोटोत त्यांच्या हातात दिसणा-या बांगडय़ा मिळाल्या नाहीत, अशी माहिती शुभलता यांचे शेजारी गणेश शेट्टी यांनी दिली. यानंतर शेट्टी कुटुंबीयांनी हा फोटो रेल्वेमंत्री पीयूष गोयल, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना मेंशन करुन ट्विट केला आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये शुभलता यांच्यासह त्यांच्या मैत्रिणीचाही समावेश आहे. परळ टर्मिनसहून सुमारे १०० फे-या चालविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.या टर्मिनसवरून सीएसएमटीप्रमाणेच ठाणे, कल्याण आदी स्थानकांच्या दिशेने लोकल सोडल्या जातील.इतर स्थानकांवरील वाढत्या गर्दीचा ताण
पादचारी पुलांचे आठवडय़ात ऑडिट
एलफिन्स्टन स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर रेल्वेच्या मुंबईतील सर्व पादचारी पुलांचे आठवडय़ाभरात ऑडिट करण्याचे आदेश रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी दिले. मुंबईतील प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणा-या अतिरिक्त फे-यांचे उद्घाटन करण्यासाठी मुंबईत आलेल्या गोयल यांना चेंगराचेंगरीतील दुर्घटनेच्या प्रसंगास सामोरे जावे लागले. त्यानंतर गोयल यांनी मध्य, पश्चिम, मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी)च्या ज्येष्ठ अधिका-यांची बैठक घेतली. त्यात गर्दीचे प्रमाण पाहून अतिरिक्त पादचारी पूल उभारण्यासंदर्भातही सूचना केल्या आहेत.
मुंबईतील रेल्वेच्या अखत्यारीतील पादचारी पुलांचे आठवडय़ाभरात ऑडिट करण्याचे आदेश देतानाच त्यातील प्रलंबित कामे जलदगतीने करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. एलफिन्स्टन स्थानकात चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची गंभीर दखल घेतानाच पादचारी पुलांसंदर्भात आढावा घेतला. पश्चिम रेल्वेवर स्थानकात ८८ पादचारी पूल असून अन्यत्र २१ पूल आहेत. मध्य रेल्वेवरील मुंबई विभागात पादचारी पुलांची संख्या १३४ इतकी आहे. गोयल यांनी घेतलेल्या बैठकीनंतर इलेक्ट्रॉनिक सर्वेक्षणाची पद्धत वेळेत पूर्ण करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, राज्य सरकार, एमएमआरडीए, सिडको, मुंबई पालिका आदींशी संबंधित असणा-या प्रलंबित प्रश्नाचा आठवडय़ाभराच्या निपटारा करण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.