मराठी गायक जयवंत कुलकर्णी म्हणजे जणू दादा कोंडके यांचा आवाज. त्यांचं ‘हिल हिल पोरी हिला..’ हे गाणं आजही खूप लोकप्रिय आहे. आजोबांचा गोड गळा आणि संगीताचा वारसा त्यांचा नातू निहार शेंबेकर याच्यातही उतरला आहे.
नुकताच आलेल्या गणवेश चित्रपटातील गीत आणि संगीताचं प्रेक्षकांसह समीक्षकांनीही भरभरून कौतुक केलं. याचं संगीत निहार शेंबेकर या तरुण संगीतकाराने दिले आहे. आजोबा जयवंत कुलकर्णी यांची गाणी ऐकत मोठा झालेल्या निहारला बालपणापासूनच संगीताची आवड होती. तेव्हापासूनच तो गाणं शिकत होता. साडेचार वर्षाचा असताना त्याने पहिलं बालगीत गायलं. त्याचे वडील किरण शेंबेकर आणि आई संगीता शेंबेकर दोघेही गाणी गातात. त्याचे वडील किरण ‘झपाटा’ वाद्यवृंदात भागीदार होते.
निहारने सहा वर्षाचा असताना अल्बमसाठी गाणं गायलं. त्याचा अल्बम आला. सर्वात लहान गायक म्हणून त्याची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली. निहारने ‘गदर’मध्ये लहान मुलाच्या तोंडी असलेले ‘उड जा काले कावा’ हे गाणं गायलं जे खूपच लोकप्रिय झालं. ज जंतरममध्येही तो गायला. अभिनय आणि गाणं या दोन्ही गोष्टी निहारकडे आहेत.
‘चिमणी पाखरं’ या अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे अभिनीत मराठी चित्रपटात निहारने त्यांच्या अपंग मुलाची भूमिका केली आहे. पाच-सहा वर्षाचा होईपर्यंत निहार सतत गाणी गात होता. शिक्षणात हुशार असलेल्या निहारला गाण्याला चाल लावण्याचीही आवड निर्माण झाली.
निहारने प्रथम शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलं. दहावी, बारावीत ९० टक्के गुण मिळवणा-या निहारने पदवी घेतल्यानंतर मॅनेजमेंटमध्ये एमबीए केले. पण मनाचा कौल परत परत संगीताकडेच वळत होता. शैक्षणिक कारकीर्द उज्ज्वल असतानाही रक्तातील कलेची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती.
कलावंत मनाची घुसमट होत होती. गाणं, संगीत ही ईश्वरी देणगी आहे ती सर्वानाच लाभत नाही अशी आत्म्याने साद घातली आणि मग बस्स.. संगीतातच कारकीर्द करायचं असं ठरलं, मग विद्यापीठाचा साऊंड रेकॉर्डिगचाही कोर्स निहारने केला. मग लोकसंगीत, रॉक, शास्त्रीय संगीत यात विविध प्रयोग करायला सुरुवात केली.
‘स्प्लीट पर्सनॅलिटी’ हा अल्बम निहारने संगीतकार आणि गायक म्हणून केला. ‘निहार लाईव्ह’ हा निहारचा स्वत:चा बॅण्डही आहे. अनेक मालिकांचे शीर्षकगीताचे संगीत निहारने केले. यात दुर्वा, माझे मन तुझे झाले, बे दुणे दहा, या मालिकांचा समावेश आहे. पोस्टर बॉईज चित्रपटाचे प्रमोशनल साँग देखील निहारने केले. स्नेहा खानविलकर या संगीतकार तरुणीचा सहाय्यक म्हणूनही निहारने काम केलं.
वेगवेगळ्या प्रकारे संगीताच्या क्षेत्रात काम करत असताना निहारच्या असं लक्षात आलं, आपण संगीतकार म्हणून जास्त रमतो. आता त्याच्यासमोर तेच ध्येय आहे. गणवेशच्या गाण्याच्या यशाने त्याचा आत्मविश्वास दुणावला आहे. आपले आजोबा जयवंत कुलकर्णी यांचा खूपसा सांगीतिक सहवास निहारला लाभला. ते त्याला शिकवायला बसवायचे तेव्हा मात्र छोटया निहारला कंटाळा यायचा.
लहानपणापासून निहारच्या कानावर विविध मराठी गाणी पडली. त्याला त्याच्या आजोबांचं ‘वाट संपता संपेना..’ हे गाणं खूप आवडतं. ‘हिची चाल तुरु तुरु’ हे गाणंही त्याच्या असंच आवडीचं. सुगम संगीतात जास्त रस असलेला निहार यू टय़ूबवर गाण्यांची कव्हर्स करतो.
कव्हर्स म्हणजे एखाद्या लोकप्रिय गाण्याचा मूळ बाज कायम ठेवून नवीन वाद्यमेळ वापरून ते गाणं बनवायचं. ‘भूली हुई यादें’ या त्यांच्या वाद्यवृंदात किशोरकुमारचे निस्सीम चाहते असलेले त्याचे वडील किरण, आई संगीता, स्वत: निहार आणि त्याचा धाकटा भाऊही गातो. एक सुरेल परिवार असंच शेंबेकर कुटुंबीयांचं वर्णन करावं लागेल.