नवीन वर्ष सुरू झालं आहे. अनेक संकल्पही तरुणांनी मनाशी धरले असतील. जिमला सुरुवात करण्यापासून ते परीक्षेपर्यंत सर्व लेक्चर बसण्यापर्यंत काहीही संकल्प तरुणाई आखत असते. वर्षाच्या शेवटी यापैकी किती संकल्प तडीस गेलेले असतात हा मोठा प्रश्नच आहे. संकल्प मोडण्यासाठीच असतात असाही काहींचा समज असतो. मात्र तरीही एक नियम असल्याप्रमाणे अनेक जण नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प करतोच.
बारावीची परीक्षा आता तोंडावर आली आहे. बारावीत चांगले गुण मिळाले तर मला पुढे करिअरच्या दृष्टीने चांगला फायदा होऊ शकेल. त्यामुळे आता असलेल्या कालावधीत फक्त अभ्यासाकडेच लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आहे, जेणेकरून बारावीत चांगले गुण मिळवता येतील. पूर्ण वर्षभरात थोडाफार अभ्यास झाला आहे, त्याचा सराव केला तरी बारावीत चांगले गुण मिळू शकतील. – सौदामिनी बोकिल, बिर्ला महाविद्यालय
पुस्तक वाचण्याचा संकल्प
मला लिखाणाची आवड आहे. मात्र कामाच्या घाई-गडबडीत वाचायला आणि लिहायला वेळ मिळत नाही. पण यंदा मी ठरवलं आहे, एका महिन्यात निदान एक तरी पुस्तक वाचायचंच. त्यामुळे वर्षभरात १२ पुस्तकं वाचून होतील. रुटीनच्या वेळापत्रकात बदल करून मी पुस्तक वाचण्यासाठीही एक तास काढणार आहे. शिवाय न्यू इयर गिफ्ट म्हणून माझ्या आईने मला पुस्तकांचा सेट भेट दिला आहे. – वनिता टाव्हरे, खालसा महाविद्यालय
जॉबमध्ये प्रगती
मी कॉलेजही करते आणि जॉबही करते. मात्र जॉब करताना मला अभ्यासासोबतच कामातही प्रगती करायची आहे. त्यामुळे या वर्षाच्या शेवटी कॉलेजच्या प्रगतिपुस्तकासोबतच कामातही प्रगती केल्याची पावती मला हवी आहे. याचा फायदा मला नक्कीच पुढच्या करिअरमध्ये होईल. – करिश्मा भुरखे, साठय़े महाविद्यालय
नृत्य शिकणार
मला लहानपणापासूनच नाचायची आवड आहे. शाळेत असताना अनेक नृत्य स्पर्धेत भाग घेतला होता. मात्र कॉलेज सुरू झाल्यावर नृत्य कलेशी माझा संबंध सुटला. मात्र या वर्षात मी पुन्हा नृत्य शिकण्याचा संकल्प केला आहे. निदान नृत्यातील एक प्रकार तरी मला या वर्षात शिकायचाच आहे.
– निकिता मूरकर
संकल्प पूर्ण करण्याचा संकल्प
गेल्या अनेक वर्षात मी खूप संकल्प केले आहेत. मात्र त्यातील एकही संकल्प पूर्ण केला नाही. पण या वर्षी हे सगळे संकल्प पूर्ण करण्याचा मी संकल्प केला आहे. या सा-या संकल्पांमध्ये माझी अनेक स्वप्न आहेत. त्यामुळे हे संकल्प पूर्ण केल्याने माझी स्वप्न पूर्ण केल्यासराखंच असेल.
– सोनाली पाष्टे, रुपारेल महाविद्यालय
विविध प्रांतातील खाद्यपदार्थ शिकायचंय
मी फार फुडी आहे. शिवाय खाद्यपदार्थ संबंधातील अनेक कार्यशाळांना मी हजेरी लावत असते. त्यामुळे विविध भागातील, प्रांतातील पदार्थ बनवायला आणि खायला मला आवडतात. त्यामुळे या वर्षात विविध प्रांतातील जेवण शिकायची फार इच्छा आहे. अशा वेगवेगळ्या वर्कशॉपना हजेरी लावत मी नक्कीच छान पदार्थ शिकेन. – राधिका झरकर, अभ्युदय एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज
विविध प्रांतातील खाद्यपदार्थ शिकायचंय
मी फार फुडी आहे. शिवाय खाद्यपदार्थ संबंधातील अनेक कार्यशाळांना मी हजेरी लावत असते. त्यामुळे विविध भागातील, प्रांतातील पदार्थ बनवायला आणि खायला मला आवडतात. त्यामुळे या वर्षात विविध प्रांतातील जेवण शिकायची फार इच्छा आहे. अशा वेगवेगळ्या वर्कशॉपना हजेरी लावत मी नक्कीच छान पदार्थ शिकेन. – राधिका झरकर, अभ्युदय एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज