नेरूळ मधील पोतदार शाळेतील विद्यार्थ्यांंना शाळेची बस दुपारी शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना बसने अचानक पेट घेतला.
नवी मुंबई- नेरूळ मधील पोतदार शाळेतील विद्यार्थ्यांंना शाळेची बस दुपारी शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना बसने अचानक पेट घेतला. यावेळी विद्यार्थी बसमधून खाली उतरण्याच्या आधी पुढील बाजूस आग लागली. त्यामुळे गोंधळ उडाला.
सुरक्षा रक्षकांनी अग्निरोधक यंत्राचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढता आले. नेरूळमधील स्टेट बँक वसाहतीमधील पोतदार शाळेची बस विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी आली.
बस थांबल्यावर अचानक बसने पेट घेतल्याने विद्यार्थी घाबरले आणि आरडाओरड सुरू झाली. या गोंधळाने प्रवेशद्वारावर असलेले विलास सकपाळ, अक्षय भोईर, संजय शेटे व सुदर्शन या सुरक्षा रक्षकांनी धाव घेऊन अग्निरोधक साहित्याचा वापर करून आग ताबडतोब आटोक्यात आणली.
या दरम्यान या सुरक्षा रक्षकांनी बसमधील सर्व ६० विद्यार्थ्यांना सुखरूप बस खाली उतरवून घरी सोडले. बसमधील पुढील बाजूस चालकाच्या केबिनजवळील भागाने अचानक पेट घेतला होता. या घटनेबाबत तक्रार करणार असल्याची माहिती समाजसेवक रवींद्र वालावलकर यांनी दिली आहे.