भाजपप्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी भरला.
नवी दिल्ली- भाजपप्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी भरला. यावेळी त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या मित्रपक्षांचे नेते आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
#PresidentialPoll polls: NDA's presidential candidate Ram Nath Kovind files his nomination papers in presence of PM Modi pic.twitter.com/GdVigAEHdk
— ANI (@ANI_news) June 23, 2017
मिळालेल्या माहितीनुसार, कोविंद यांच्या उमेदवारीसाठी भाजपने वेगेगळे चार सेट तयार केले आहेत. एका अर्जावर सूचक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह हे आहेत.
दुस-या सेटवर सूचक म्हणून अमित शाह आणि अरुण जेटली यांनी कोविंद यांचे नाव सुचवले आहे. तर तिस-या सेटवर सूचक म्हणून अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल आणि व्यंकय्या नायडू यांनी हे नाव सुचवले आहे. तसेच चौथ्या सेटवर सूचक म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुषमा स्वराज यांचे नाव आहे.
या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र शिवसेनेकडून कोणीही उपस्थित नव्हते. मात्र कोविंद यांच्या उमेदवारी अर्जावर शिवसेनेचे खासदार अनंत गीते, संजय राऊत आणि आनंदराव अडसूळ या तिघांच्या सह्या आहेत.
दरम्यान, आतापर्यंत २७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख २८ जून आहे. तर एक जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतर १७ जुलै रोजी मतदान होईल आणि २० जुलै रोजी राष्ट्रपतींची घोषणा होईल.