अर्थसंकल्पामध्ये ६५ विद्युत प्रणालीवर चालणा-या बसेस खरेदी करण्यात येणार असून यामुळे प्रदूषण कमी होणार असल्याचा दावा परिवहनने केला आहे.
नवी मुंबई- नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा सन २०१६-१७ चा रु. २४० कोटी ५१ लक्ष १३ हजार जमा आणि रु. २४० कोटी ४३ लक्ष २८ हजार खर्च व रु. ७ लक्ष ८५ हजार शिल्लक रक्कमेचा सुधारित व सन २०१७-१८ चा मूळ रु. ३०९ कोटी ७९ लक्ष ८० हजार जमा व रु. ३०९ कोटी ७३ लक्ष ४० हजार खर्चाचा आणि रु. ६ लक्ष ४० हजार शिलकीचा अर्थसंकल्प, परिवहन व्यवस्थापक शिरिष आरदवाड यांनी परिवहन समिती सभापती मोहन म्हात्रे यांना सादर केला.
या अर्थसंकल्पामध्ये ६५ विद्युत प्रणालीवर चालणा-या बसेस खरेदी करण्यात येणार असून यामुळे प्रदूषण कमी होणार असल्याचा दावा परिवहनने केला आहे. नवी मुंबई मनपा परिवहनसेवेने जलवाहतूक सुरू करण्यासाठी या अर्थसंकल्पत तरतूद केली आहे.
राज्य सरकार व सिडको लि. यांचेकडून नवी मुंबईतील बांधकामास १.५ चटईक्षेत्र निर्देर्शांक मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे उपक्रमाच्या ताब्यात असलेले वाशी, सी.बी.डी. व रबाळे येथील बस टर्मिनस व आगार व्यापारी तत्वावर महानगरपालिकेच्या निधीतून विकसित करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने जलवाहतुकीचे अन्यसाधारण महत्व विचारात घेऊन जलवाहतुकीस प्रोत्साहन देण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने नवी मुंबई महानगरपालिकेस बेलापूर ते मुंबई व उरण असे दोन प्रवासी जलवाहतूक मार्ग तांत्रिकदृष्टया शक्य असलेला अहवाल नवी मुंबई महानगरपालिकेस सादर केला आहे. ही सेवा परिवहन उपक्रमामार्फत चालविण्यासाठी या आर्थिक वर्षात तरतूद केलेली आहे.
केंद्र शासनाच्या आर्थिक सहाय्याने रबाळे आगार येथे अत्याधुनिक सेवासुविधांसह चालक प्रशिक्षण केंद्र बांधण्याचे प्रस्तावित आहे. आयटीएस प्रणालीद्वारे उपक्रमाच्या सर्व बस मार्गावर नियंत्रण ठेऊन प्रवाशांना वेळेसंदर्भात माहिती उपलब्ध करुन देणे तसेच बसच्या फे-यांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे.
बस खरेदी, जलवाहतूक, टर्मिनस विकास याकरता लागणारा निधी नवी मुंबई महानगरपालिकेकडून अनुदान स्वरुपात उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी सन २०१७-१८ करता परिवहन उपक्रमाच्या अर्थसंकल्पात १०० कोटी रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे.