नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतर आता महापौरांनी त्यांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.
नवी मुंबई- नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतर आता महापौरांनी त्यांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. या ठरावानंतर आयुक्तांना अधिकार राहिलेले नसल्याने प्रशासनाच्या कुठल्याही अधिका-याने आयुक्तांकडे कुठलीही फाईल मंजुरीसाठी पाठवू नये, असे आदेश महापौर सुधाकर सोनावणे यांनी प्रशासनाला दिले आहेत. याबाबत मुख्य लेखाधिका-यांना त्यांनी पत्रही दिले आहे. शिवाय आयुक्तांनीही कुठलाही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, असे यावेळी सोनावणे यांनी म्हटले आहे.
गुरुवारी सकाळी आयुक्त मुंढे पालिकेत आल्यानंतर ठरावाच्या बाजूने असलेले सर्वपक्षीय नगरसेवक पालिकेत आले. मात्र यावेळी आयुक्त एमआयडीसीच्या दौ-यावर निघून गेले. त्यामुळे महापौर, नगरसेवक आणि आयुक्त समोरासमोर आले नाहीत. महापौरांनी प्रशासकीय अधिका-यांना दिलेल्या या आदेशानंतर आयुक्तांनी कुठल्याही अधिका-याने महापौरांच्या दालनात जाऊ नये, असे आदेश दिले असून यामुळे अधिका-यांची कोंडी झाली आहे, तर महापौर आणि आयुक्तांचा वाद आणखी वाढू लागला आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे महापौर सोनावणे यांनी सांगितले आहे. आयुक्तांच्या हेकेखोरपणामुळेच कर्मचा-यांचे सानुग्रह अनुदान लटकले असून आपण मागासवर्गीय असल्याने आयुक्त आपल्याशी असे वागत असल्याचे म्हणत महापौरांनी या वादाला जातीयवादी रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान, आयुक्त कितीही कडक असले, तरी दिवाळीनिमित्त ठेकेदारांकडून मात्र बिनधास्तपणे अधिका-यांना दिवाळीची भेट पोहोचवली जात असल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले.
मुख्यमंत्र्यांनी पाठीशी घातल्यास राजीनामा
सर्वसाधारण सभेने बहुमताने आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव करुन मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असून यानंतर जर मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना पाठीशी घातले, तर मी राजीनामा देईन, अशी भूमिका महापौर सुधाकर सोनावणे यांनी घेतली आहे. शिवाय ही माझी वयक्तिक भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.