पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये भाजपाने सरकार स्थापन केले आणि उत्तर प्रदेशात ऐतिहासिक यश मिळवले.
नवी दिल्ली- पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये भाजपाने सरकार स्थापन केले आणि उत्तर प्रदेशात ऐतिहासिक यश मिळवले. त्यानंतर आता भाजपाचं पुढचं लक्ष्य गुजरातवर असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता भाजपा तयारी करत आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांचं राज्य आहे त्यामुळे भाजपाला येथे यश मिळवायचं आहे.
उत्तर प्रदेशात मोदी लाटची लिटमस टेस्ट झाल्यानंतर भाजपा लवकरच गुजरातमध्ये निवडणुका घेऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात मॉडलच्या जोरावर पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली होती. याच विकासाच्या मॉडेलवर त्यांनी उत्तर प्रदेशात ऐतिहासिक विजय मिळवला.
उत्तर प्रदेशमध्ये ४०३ पैकी ३२५ जागा जिंकणारा भाजपा सध्या आनंदात आहे. गुजरातमध्ये आता त्यांनी १५० जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गुजरात विधानसभेमध्ये १८२ जागा आहेत.
२०१९ साठी गुजरात महत्त्वाचे
गुजरातमध्ये भाजपा जवळपास २० वर्षापासून सत्तेत आहे. हेच कारण आहे की, २०१९ लोकसभा निवडणुकी आधी गुजरात निवडणूक जिंकणे भाजपासाठी महत्त्वाचे आहे. गुजरातमध्ये जय किंवा पराजयचा मोदींवर सरळ परिणाम होईल.
गुजरातमध्ये अनेक आव्हानं
जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या सत्तेतून बाहेर पडून केंद्रात आले आहेत तेव्हापासून भाजपासाठी गुजरातमध्ये आव्हाने वाढत आहेत. आरक्षणासाठी पाटीदार समाजाची नाराजी, हार्दिक पटेल, अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष हे आव्हानं भाजपापुढे असणार आहेत. आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला यांचा सामना करावा लागणार आहे.