मुंबईतील मोठया नाल्यांमधील भ्रष्टाचारप्रकरणी २३ कंत्राट कंपन्यांना काळया यादीत टाकल्यानंतर आता महापालिकेने छोटया नाल्यांमधील कंत्राट कामांमधील भ्रष्टाचाराची चौकशी हाती घेतली आहे.
मुंबई- मुंबईतील मोठया नाल्यांमधील भ्रष्टाचारप्रकरणी २३ कंत्राट कंपन्यांना काळया यादीत टाकल्यानंतर आता महापालिकेने छोटया नाल्यांमधील कंत्राट कामांमधील भ्रष्टाचाराची चौकशी हाती घेतली आहे.
मोठया नाल्यांच्या तुलनेत छोटया नाल्यांची कामे फारच कमी प्रमाणात झाल्याचा आरोप होत असल्यामुळे छोटया नाल्यांच्या कंत्राट कामांची चौकशी करण्यात येणार असून ही जबाबदारी तांत्रिक लेखा परीक्षण चाचणी व दक्षता विभाग (टावो) आणि चौकशी अधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे.
मोठया नाल्यांच्या सफाईतील भ्रष्टाचाराप्रमाणेच छोटया नालेसफाईतही तेवढाच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असल्यामुळे मोठया नाल्यांची सफाई पूर्ण झाल्यानंतर तिस-या टप्प्यात छोटया नाल्यांच्या सफाई कंत्राट कामांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
मुंबईतील सर्व छोटया नाल्यांची जबाबदारी ही संबंधित विभाग कार्यालयांची असून त्या कामांवरील देखरेख ही संबंधित विभागाच्या सहायक आयुक्तांची आहे. त्यामुळे २४ विभाग कार्यालयांमधील छोटया नाल्यांची कंत्राट कामांची चौकशी केली जाणार असल्याचे समजते. याबाबत अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी विभागाला तशाप्रकारे सूचना दिल्याचेही समजते.
मोठया नाल्यांमधील कंत्राटदारांच्या काळया यादीचा निर्णय लवकरच मोठया नाल्यांमधील दोषी कंत्राटदारांना काळया यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर कंत्राट कंपन्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
यानंतर न्यायालयाने महापालिकेला झापत नॅचरल जस्टीसच्या नावाखाली त्यांची बाजू ऐकून घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता सर्वाची सुनावणी पूर्ण झाल्यांनतर सर्वच २३ कंपन्यांना काळया यादीत टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून याबाबत लवकरच निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनीही याला दुजोरा दिला आहे. याबाबतच्या फाईलवर स्वाक्षरी झाली असून त्याबाबतचे निर्णय जाहीर केला जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, छोटया नाल्यांच्या कंत्राट कामांच्या चौकशीबाबत बोलणे त्यांनी टाळले.