नागपूर रेल्वे स्थानकात एक महिला आपल्या चिमुकल्या परिला कुशीत घेऊन अनंताच्या प्रवासाला निघून गेल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना घडली.
नागपूर- नागपूर रेल्वे स्थानकावर हृदय हेलावून टाकणारी घटना मंगळवारी रात्री घडली. रेल्वे स्थानकात एक महिला आपल्या चिमुकल्या परिला कुशीत घेऊन अनंताच्या प्रवासाला निघून गेली. पोलीस त्या अडिच वर्षाच्या चिमुकलीला आईच्या पार्थिवापासून दूर करत असतांना तिचा आक्रोश पाहून स्थानकावरील प्रवाशांच्या डोळ्यातही अश्रू आले.
गेल्या दोन महिन्यांपासून एक महिला आपल्या अडिच वर्षाच्या चिमुरडीला घेऊन नागपूर रेल्वे स्थानकात राहत होती. अनेक प्रवाशांनी तिला पाहिले होते. पण ही महिला कोण होती, कुठून आलेली, तिचे नाव काय याबाबत कोणालाही माहिती नव्हती. ती महिला थोडी वेडसर वाटायची पण तिला मातृत्वाचे भान कायम होते. तीने कधीही आपल्या चिमुकलीला आपल्यापासून दूर केले नसल्याचे सांगण्यात येते. ती कधी भीक मागत असल्याचे कोणीही पाहिले नव्हते. पण त्या चिमुरडीला बघून अनेक प्रवासी तिच्या पुढे खाण्याचे पदार्थ ठेवायचे. त्यावर ती महिला आपले आणि लेकीचे पोट भरायची.
मंगळवारी रात्री दोघीही आरक्षण काऊंटर परिसरात झोपल्या होत्या. रात्री साडेबाराच्या सुमारास अचानक त्या महिलेला झटके येऊ लागले. त्यामुळे तिची छकुली उठली आणि आईची अवस्था पाहून रडू लागली. त्यामुळे महिलेने स्वतःला सावरले आणि चिमुरडीला बिस्कीट खायला दिले. त्यानंतर तिने लेकीला कुशीत घेऊन थोपटायला सुरूवात केली. काही वेळाने थोपटणा-या तिच्या हाताची हालचाल मंद होत होत आता थांबली होती. तिचे डोळे सताड उघडे होते.
स्थानकावर प्रवाशाने पाहिल्यानंतर त्याला शंका आली. त्याने पोलिसांना माहिती दिली. रात्री दीडच्या सुमारास गस्तीवरील लोहमार्ग पोलीस घटनास्थळी आले. ती महिला मृत अवस्थेत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पण ती अडिच वर्षाची चिमुकली आईच्या कुशीत गाढ झोपली होती.
आईच्या कुशीतून मुलीला बाहेर कसे काढायचे असा प्रश्न पोलिसांना होता. महिला पोलिसांच्या मदतीने मुलीला आईच्या मृतदेहापासून दूर केले तेव्हा तिला जाग आली आणि ती रडू लागली. काय होत आहे हे तिला कळत नव्हते. पण ती आईला सोडायला तयार नव्हती. आपले नाव ती मुलगी किरण असे सांगत होती.