माओवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक जी. एन. साईबाबा याच्यासह पाच जणांना गडचिरोलीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
नागपूर- माओवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक जी. एन. साईबाबा याच्यासह पाच जणांना गडचिरोलीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. महेश तिरकी, पांडू नरोटे, हेम मिश्रा आणि प्रशांत राही अशी इतर चौघांची नावे आहेत. या सर्वाना ‘बेकायदा कारवाया’ कायद्यांतर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली. विजय तिरकी याला दहा वर्षाची सक्तमजुरी देण्यात आली.
माओवादी चळवळी करणा-यांना हा मोठा फटका मानला जात आहे. विद्यापीठासारख्या शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात काम करणा-या व्यक्तीला अशी शिक्षा होण्याची ही पहिली वेळ आहे. हिंसक कारवायांसाठी दिल्ली विद्यापीठातील तरुण कार्यकर्त्यांना तयार करणे, त्यांना गडचिरोलीतील जंगलात पाठवणे, माओवादी विचारांचा प्रसार करणे, त्यांच्यासाठी ‘थिंक टँक’ म्हणून काम करणे असे आरोप साईबाबावर होते. ते सारे न्यायालयात सिद्ध झाले.
रिव्होल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट व सीपीआय माओवादी संघटनेशी साईबाबा संबंधित होता. मे २०१४ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या आवारात असलेल्या निवासस्थानातून गडचिरोलीच्या पोलिसांनी साईबाबाला अटक केली होती. त्यावेळी संगणकाची हार्ड डिस्क, पेन ड्राइव्ह, सीडी, व्हीडिओ टेप, माओवादी प्रसार साहित्य जप्त करण्यात आले होते. हे पुरावे कोर्टाने ग्राह्य धरले.
२०१२ मध्ये या विद्यापीठात फ्रंटल ऑर्गनायजेशन कमेटीचा सहसचिव म्हणून साईबाबाची नियुक्ती करण्यात आली होती. त्याबाबतचा व्हीडिओही मिळाला आहे. त्यात प्रशांत राही हा व्यासपीठावर दिसतो आहे. २०१४ मध्ये अटक झाल्यानंतर साईबाबा काही काळ नागपूरच्या तुरुंगात होता.
नागपूर हायकोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने हा खटला दररोज चालवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गडचिरोली न्यायालयाने काम करून एकूण २३ साक्षीदार तपासले.
साईबाबा हा अपंग असल्याचा दावा करीत असला तरी माओवाद्यांसाठी तो ‘थिंक टँक’ म्हणून काम करीत होता ही बाब सरकारी वकील प्रशांतकुमार सत्यनाथन यांनी कोर्टाला पटवून दिली. साईबाबाने हेम मिश्राचे ‘ब्रेन वॉश’ करून त्याला गडचिरोलीच्या जंगलात कारवायांसाठी पाठवले होते हेही कोर्टात सिद्ध झाले.