आयपीएलमध्ये गुरुवारी (६ एप्रिल) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) गहुंजे स्टेडियमवर होणा-या लढतीत माजी विजेता मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स हे महाराष्ट्रातील दोन संघ आमनेसामने आहेत.
पुणे- आयपीएलमध्ये गुरुवारी (६ एप्रिल) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) गहुंजे स्टेडियमवर होणा-या लढतीत माजी विजेता मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स हे महाराष्ट्रातील दोन संघ आमनेसामने आहेत. ‘महाराष्ट्र डर्बी’च्या या लढतीची मोठी उत्सुकता आहे.
पुणे संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ करतोय. त्याच्या नेतृत्वाखालील संघात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह अजिंक्य रहाणे, फाफ डु प्लेसिस आणि इम्रान ताहीरसह यंदाच्या हंगामातील सर्वात महागडा क्रिकेटपटू इंग्लंडचा बेन स्टोक्स असे ‘स्टार’ क्रिकेटपटू आहेत.
ऑस्ट्रेलियासह स्मिथसाठी पुणे स्टेडियम ‘लकी’ ठरले. पहिली कसोटी जिंकून त्यांनी भारताची विजयी मालिका खंडित केली होती. गत मोसमात पुण्याची कामगिरी उंचावली नाही. मात्र घरच्या मैदानावर आश्वासक सुरुवात करण्यास यजमान उत्सुक आहेत.
२०१३ आणि २०१५मधील ‘चँपियन्स’ मुंबईने तिस-या जेतेपदासाठी कंबर कसली आहे. मागील हंगामात त्यांची कामगिरी ढेपाळली. मात्र ‘झाले गेले विसरून’ नव्याने सुरुवात करण्याचा इरादा रोहित शर्मा आणि सहका-यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईची फलंदाजीची भिस्त कर्णधार रोहितसह पार्थिव पटेल, जोस बटलर, कीरॉन पोलार्ड आणि हार्दिक पंडय़ावर आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसित मलिंगा दहाव्या हंगामासाठी उपलब्ध असला तरी मायदेशात बांगलादेशविरुद्ध खेळत असल्याने तो पुण्याविरुद्धच्या लढतीला मुकला आहे. त्याच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज टिम साऊदी, मध्यमगती गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंडय़ा तसेच ऑफस्पिनर हरभजनवर मुंबईची गोलंदाजीची मदार आहे.
वेळ : रा. ८ वा.
थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स.