पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर दरड कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांतर्फे तपासणी करण्यात आली.
पुणे- पावसाला सुरूवात झाली असून अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर दरड कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांतर्फे तपासणी सुरु करण्यात आली. यामध्ये ज्या भागात दगड किंवा दरड कोसळण्याचा धोका आहे अशा भागातील माती व दगड तातडीने हटवण्याचे काम सुरू केले.
खालापूर ते खंडाळा या भागात ही तपासणी मंगळवारी सकाळपासून सुरू केली. या तपासणी दरम्यान ज्याठिकाणी धोकादायक दगड किंवा दरड आहेत ते हटवण्याचे काम करण्यात आले. दहा मिनिटांसाठी वाहतूक थांबवून हे काम करुन तातडीने वाहतूक सुरळीत चालू करण्यात येत आहे.
या तपासणीसाठी कोणताही ब्लॉक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे या भागात कोणतीही वाहतूक कोंडी नसल्याचे समजते. पोलीस कर्मचारी, क्रेन, व डंपर अशी यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. ही तपासणी मंगळवार (२७जून) पासून सुरु करण्यात आली असून सुरक्षिततेचा विचार करता पावसाळ्यात ही तपासणी नियमीतपणे करण्यात येणार आहे.