राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी आज दुपारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
मुंबई- राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी आज दुपारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. रॉय यांना तात्काळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
गेल्या काही काळापासून त्यांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले होते. फिटनेसवर प्रचंड भर देणारे हिमांशू रॉय यांना हाडांचा कॅन्सर झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. एटीएसमध्येच असताना त्यांना हा आजार झाला होता. त्यामुळे गेली दोन वर्ष ते वैद्यकीय रजेवर गेले होते. अमेरिकेत जाऊन त्यांनी उपचारही घेतले होते. त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत होती. मात्र तरीही त्यांना प्रचंड नैराश्य आले होते. त्यामुळेच या आजाराला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
हिमांशू रॉय हे १९८८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. हुशार आणि धाडसी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. २०१३ मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात विंदू दारासिंहला त्यांनी अटक केली होती. तसेच, दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण, पत्रकार जेडे हत्या प्रकरण, विजय पालांडे, लैला खान डबल मर्डर केस, अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्या प्रकरण अशी महत्त्वाची प्रकरणे सोडविण्यात हिमांशू रॉय यांची मोठी भूमिका होती.
मुंबई गुन्हे अन्वेषण विभागात सह पोलीस आयुक्त, दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख आणि राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांनी अनेक हायप्रोफाइल केसेस हाताळल्या होत्या.
» हिमांशू रॉय यांचा अल्प परिचय
» शिक्षण- मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज
» १९८८ बॅचचे आयपीएस अधिकारी
» १९९५- नाशिक ग्रामीण भागाचे पोलीस अधीक्षक
» अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक
» पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा
» पोलीस उपायुक्त वाहतूक, पोलीस उपायुक्त झोन-१,
» नाशिक शहर पोलीस आयुक्त (२००४-२००७)
» मुंबईत सहपोलीस आयुक्त म्हणून २००९ साली नेमणूक
» महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून नेमणूक
» अतिरिक्त पोलीस महासंचालक (नियोजन आणि समन्वय)