मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार फोफावत असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत पकडल्या जाणा-या महापालिकेच्या अधिकारी-कर्मचा-यांची संख्या अधिक असल्याचे अहवालातून समोर आले आहे.
मुंबई- मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार फोफावत असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत पकडल्या जाणा-या महापालिकेच्या अधिकारी-कर्मचा-यांची संख्या अधिक असल्याचे अहवालातून समोर आले आहे.
२०१५च्या एसीबीच्या वार्षिक अहवालानुसार मुंबई विभागातून लाचखोरीप्रकरणी दाखल झालेल्या एकूण ७२ गुन्ह्यांमध्ये पालिकेच्या अधिकारी-कर्मचा-यांविरोधात २३ गुन्हे नोंदवण्यात आले होते, तर जानेवारी ते जून २०१६ पर्यंत दाखल एकूण ४९ लाचखोरीच्या गुन्ह्यांपैकी पालिका अधिकारी-कर्मचा-यांविरोधात नऊ गुन्हे दाखल झालेले आहेत.
२०१५ मध्ये पालिका अधिकारी-कर्मचा-यांविरोधात दाखल झालेल्या २३ गुन्ह्यांपैकी १८ गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तर दोन प्रकरणांतील आरोपींवरील कारवाई मंजुरीविना रखडलेली आहे. याशिवाय तीन गुन्हे हे अद्याप तपास प्रक्रियेवरच थांबलेले आहेत. २०१६ सालची आकडेवारी पाहता नऊपैकी एकाही प्रकरणात आरोपपत्र दाखल झालेले नाही. तर केवळ दोन प्रकरणे कारवाईच्या मंजुरीसाठी प्रलंबित असून सात गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे.
या २३ गुन्ह्यांचा तपशील पाहिला तर त्यात अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबवण्यासाठी लाच मागितल्याचे प्रमाण अधिक आहे. त्यात घरात बेकायदा दुरुस्ती करणे वा त्यावर कारवाई न करणे, बेकायदा स्टॉल्सवरील कारवाई, बेकायदा कामे हटवताना जप्त केलेल्या मालमत्तेवर कारवाई न करणे, कंत्राटांचे शुल्क मंजूर करून घेणे, अनुकूल शेरा मारून घेणे आदी कारणांसाठी प्रामुख्याने लाच मागण्यात आली आहे. याशिवाय बेकायदा बांधकामांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी, शाळेचा दाखला वा वास्तव्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच गुमास्ता परवाना मिळवण्यासाठीही पालिका अधिकारी-कर्मचा-यांकडून लाच मागण्यात येत आल्याचे एसीबीच्या अहवालात म्हटले आहे.
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार फोफावत असून भ्रष्टाचाराविरोधात सर्वच स्तरातून आवाज उठवला जातो. मात्र भ्रष्टाचाराची कीड वाढत असून दरवर्षी एसीबीच्या कारवाईत महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी जाळ्यात अडकतात. मुंबई महापालिकेच्या तिजोरीत जमा होणारा पैसा सर्वसामान्य मुंबईकरांचाच असून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मुंबईकरांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.