मुंबई महापालिकेचा २०१७-१८ या वर्षाचा अर्थसंकल्प बुधवारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समितीसमोर सादर केला.
मुंबई- मुंबई महापालिकेचा २०१७-१८ साठीच्या अर्थसंकल्पात तब्बल १२ हजार कोटीची घट करण्यात आली असून यंदा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात तब्बल १२ हजार कोटींची घट झाली आहे. महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प सादर केला.
‘बेस्ट’ची झोळी रिकामीच
सातत्याने तोट्यात असलेल्या बेस्टसाठी कोणतीही भरीव तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. त्यामुळे बेस्टसह प्रवासी वर्गाचा हिरमोड झाला आहे.
पारदर्शक कारभाराच्या मुद्द्यावर भाजपाकडून कोंडी झाल्यानंतर कसेबसे सत्तेत आलेल्या शिवसेनेने हा अर्थसंकल्प मांडताना यंदा त्यात ११,९१०.६४ कोटींची कपात करण्यात आली आहे.
पारदर्शक कारभार, जबाबदारी, काटकसर, विकास आराखड्याशी संलग्नता, आर्थिक स्त्रोतांचा सुयोग्य या पाच मुख्य मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचे मेहता यांनी सांगितले. तसेच गेल्या वर्षभरात महापालिकेने आधुनिक कारभारावर भर दिला आहे. मुंबईकरांना उत्तम सुविधा देण्यास प्रशासन बांधिल असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
मागील वर्षी नालेसफाई आणि रस्ते घोटाळ्यांवरुन विरोधकांनी शिवसेनेला सळो की पळो करुन सोडले होते. यामुळे रस्ते कामांमध्येही यंदा काटकसर करण्यात आली आहे. रस्ते पुर्नबांधणीसाठी १,०९५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षी २,८८६ कोटी एवढी तरतूद केली होती. तर यंदा नाले सफाईसाठी अवघ्या ७४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, स्थायी समितीत अर्थसंकल्पावर पुढील काही दिवस चर्चा झाल्यानंतर मे महिन्यात पालिका सभागृहात हा अर्थसंकल्प मांडला जाईल.
ठळक वैशिष्ट्ये
– ८ नवीन जलतरण तलावांसाठी ४५ कोटींची तरतूद
– राणी बागेच्या विकासासाठी ५०.२५ कोटींची तरतूद
– उद्यान खात्यासाठी पुढील वर्षात २६.८० कोटींची तरतूद
– तळोजा येथे ५२.१० हेक्टर आणि ऐरोली येथे ३२.७७ हेक्टर जागा डंपिंग ग्राऊंडसाठी केली आरक्षित, १५० कोटींची तरतूद
– सफाई कामगारांच्या आश्रय योजनेसाठी ४०.७७ कोटींची तरतूद
– ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत पंपिंग स्टेशनसाठी ६५ कोटींची तरतूद
– मुंबईत महिलांसाठी 8 नवीन शौचालयं उभारण्यासाठी २.८८ कोटींची तरतूद
– मुंबई महापालिका सन २०१७-१८चा अर्थसंकल्प. २.६० कोटी शिलकीचा
– यंदाचा अर्थसंकल्प ११ हजार ९१०.६४ कोटी रुपयांनी कमी
– गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी १३० कोटींची तरतूद
– कोस्टल रोडसाठी एक हजार कोटींची तरतूद, संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च १२ हजार कोटी रुपये
– बेस्टसाठी कोणतीही भरीव तरतूद नाही
– मुंबई महापालिकेचा २०१७-१८ चा शिक्षण समिती अर्थसंकल्प जाहीर, शिक्षण समितीसाठी २३११.६६ कोटींची तरतूद, गेल्यावर्षीपेक्षा ८३ कोटींची घट
– रस्ते दुरुस्ती आणि पुर्नबांधणीसाठी १,०९५ कोटींची तरतूद, गेल्यावर्षी २८८६ कोटी इतकी तरतूद केली होती
– मुंबईतला पार्कींग प्रश्न सोडवण्सासाठी वाहनतळांची संख्या तीन पट वाढणार
– ९२वरुन ही संख्या २७५करणार, तसंच तीन ठिकाणांच्या भूमिगत वाहनतळांसाठी १ कोटींची तरतूद
– माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत महापालिका रुग्णालयांमध्ये अद्ययावत माहिती प्रणाली उभारणार
– मेडिकल हिस्ट्री, प्राथमिक रिपोर्टस्, रुग्णांची नोंदणी, इ. माहितीसाठी सॉफ्टवेअर – माहुल आणि गजदरबांध पंपिंग स्टेशनसाठी ६५ कोटींची तरतूद
– शालेय विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मोजमाप ठेवण्यासाठी शालेय विभागाचे ऑनलाईन पोर्टल तयार करणार
– मिठी नदीच्या किना-यावरील मोकळ्या जागांवरील अतिक्रमणे हटवणे, सुशोभिकरण करणे यासाठी २५ कोटींची तरतूद
– कॅशलेस व्यवहारास उत्तेजन आणि एम गव्हर्नन्स (मोबाईल द्वारे नागरी सुविधा) साठी महापालिकेच्या ११५ सेवा
– उघड्या नाल्यांचे आच्छादीकरणासाठी नाल्यांवर अॅक्रेलिक पत्रे टाकणार, मुलुंड, कांदिवली येथे प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबवणार, तरतूद ९ कोटी
– पर्जन्य जलवाहिन्यांसाठी ४७५ कोटींची तरतूद
– महापालिका रुग्णालयात ९ नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स सुरु करणार
– प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया संसर्गरहित होण्यासाठी हे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर गरजेचे, यासाठी २१.५० कोटींची तरतूद
– महापालिका रुग्णालयातील व्हेंटिलेटर्सची संख्या ४०० पेक्षा जास्त वाढवण्यासाठी ३० कोटींची तरतूद