पाटील बुवासारखे परंतु त्याच्या इतके न फोफावलेले अनेक बुवा आज कार्यरत आहेत. अशा बाबा, बुवा आणि तांत्रिकांकडे जाणा-यांची संख्याही मोठी आहे.
रत्नागिरी- पाटील बुवासारखे परंतु त्याच्या इतके न फोफावलेले अनेक बुवा आज कार्यरत आहेत. अशा बाबा, बुवा आणि तांत्रिकांकडे जाणा-यांची संख्याही मोठी आहे. या सर्वाचा सव्र्हे करून कोकणातील बाबा, बुवा आणि तांत्रिकांची लिस्ट पोलिसांसह प्रशासनाकडे देण्यात येणार असल्याचे अनिसच्या कार्याध्यक्षा मुक्ता दाभोळकर यांनी सांगितले. पाटील बुवाचा आश्रम कायमचा बंद करण्यासाठी मोठा लढा उभारला जाणार असल्याचे दाभोळकर यांनी स्पष्ट केले. पाटील बुवाप्रकरणात अन्य साथीदारांना लवकर अटक करण्यासाठी दबाव टाकणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
झरेवाडीतील भोंदू पाटील बुवा विरोधात संघर्ष सभा रविवारी घेण्यात आली. आठवडा बाजार येथील केतन मंगल कार्यालय येथे ही सभा झाली. या बैठकीला बुवाबाजी विरोधातील अनेकजण सहभागी झाले होते. सभेला उपस्थित राहण्यापूर्वी अनिसच्या कार्याध्यक्षा मुक्ता दाभोळकर यांनी पाटील बुवाच्या झरेवाडी येथील मठाची पाहणी केली. तसेच पाटील बुवाच्या जाचाला बळी पडलेल्या महिलांचीही त्यांनी भेट घेतली. पिडीत महिलांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना मुक्ता दाभोळकर यांनी ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या कामाचे कौतुक केले. दक्षता अधिकारी यांच काम किती मोठे आहे हे विभुते यांनी राज्यासमोर आणले. जादूटोणा विरोधात पीडित व्यक्ती किंवा त्यांचे नातेवाईक समोर आले नाहीत तर अशावेळी दक्षता अधिका-यांची भूमिका फार महत्त्वाची असते आणि ती पोलीस निरीक्षक विभुते यांनी परखडपणे पार पाडल्याचे त्या म्हणाल्या. गंभीर प्रकार घडल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये असताना कारवाई होणे फार मोठी बाब आहे. आता ग्रामस्थांनी स्वत: पुढे येऊन तक्रार दाखल केल्या पाहिजेत हेच या सभेचे उद्दीष्ट असल्याचे त्या म्हणाल्या. सामान्य व्यक्ती समाजात आवाज उठवण्यासाठी घाबरतात. अशा पीडितांना बोलत करण्याची जबाबदारी माध्यम आणि पोलिसांची आहे.
मागील आठ ते दहा वर्षात पाटील बुवा मोठय़ा प्रमाणात फोफावला. या पाटील बुवासारखे पण बुवाप्रमाणे न फोफावले अनेकजण आजही समाजात आहेत. अशा बुवांकडे जाणारेही अनेकजण आहेत. पाटील बुवानंतर पुढच्या टप्प्यात छोटे-छोटे भगत, तांत्रिक आणि बुवा यांचा नंबर आहे. ज्यांच्याकडे सामान्य लोक तोडग्यासाठी जातात अशा बाबा, बुवा आणि तात्रिकांची यादी तयार करून पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडे सादर करणार असल्याचे दाभोळकर यांनी यावेळी सांगितले. आपआपल्या कार्यक्षेत्रातील अशा बुवांवर कारवाई करण्याचे काम दक्षता अधिका-यांचे आहे. पोलिसांनीही कायदा सुव्यस्थेच्या पलीकडे जाऊन सामाजिक सलोख्यासाठी काम करावे अशी अपेक्षा मुक्ता दाभोळकर यांनी व्यक्त केली. पाटील बुवा लोकांवर इलाज करण्यावर प्रसिद्ध होता. यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने पुढे येऊन भूमिका जाहीर करावी, असे आवाहन दाभोळकर यांनी यावेळी केले.
मुक्ता दाभोळकरांकडून मठाचीही पाहणी
रत्नागिरी दौ-यावर आलेल्या अंनिसच्या कार्यकत्या मुक्ता दाभोळकर रविवारी झरेवाडीतल्या पाटील बुवाच्या आश्रमात दाखल झाल्या. गावक-यांना घेऊन मुक्ता दाभोळकर यांनी आश्रमाची झाडाझडती घेतली. बाबा बसायचा कुठे, त्याचा होम कुठे व्हायचा, भक्तांसाठी त्याने काय सुविधा पुरवल्यात याचा संपूर्ण आढावा मुक्ता दाभोळकर यांनी घेतला. बाबाने थाटलेल्या आश्रमात कशा पद्धतीने आर्थिक व्यवहार चालत होते याचा आढावाही मुक्ता दाभोळकर यांनी घेतला. जवळपास अर्धा तास या आश्रमाची पाहणी करून मुक्ता दाभोळकर यांनी काही आश्रमाचे छायाचित्रणही केले.
[EPSB]
ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचे निधन
[/EPSB]