मुक्ता बर्वेने फेसबूक पेजवर शेअर केलेल्या व्हिडीओत ती घाबरलेली असल्याने एकच कल्लोळ उडाला आहे.
मुंबई- संवेदनशील अभिनेत्री अशी ओळख असलेल्या मुक्ता बर्वेने आपल्या फेसबूकवर एक व्हिडीओ अपलोड केला आणि एकच कल्लोळ उडाला आहे. या व्हिडीओत मुक्ता अतिशय घाबरलेली आहे. हा व्हिडिओ आता व्हॉट्सअँपवरही वायरल होत आहे.
‘एक तर मी तुरुंगात आहे, मला किडनॅप केलंय किंवा माझा खून झालाय…पण तुम्हाला सत्य कळायलाच हवं…मी तुम्हाला सत्य सांगायलाच हवं’ या आशयाचा व्हिडीओ फेसबूक पेजवर अपलोड केल्याने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत ती घाबरलेली आहे. तिच्या चेह-यावर घाम आणि कपाळावर रक्त दिसत आहे.
हा प्रमोशनचा भाग असल्याचा अंदाज असला, तरी इतक्या टोकाला जाऊन प्रमोशन करणे योग्य आहे का, हा मुद्दा या निमित्ताने चर्चेत आला आहे..
या व्हिडीओ मागचे नेमके सत्य काय आहे, हा लोकांच्या उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
अनेकांनी मुक्ताला काळजी घेण्याचा सल्ला दिला. तर काहींनी नवीन सिनेमा, मालिका किंवा एखाद्या नवीन नाटकाचे हे प्रमोशन आहे. असे अनेक तर्कविर्तक लावले जात आहे. पण अशा प्रकारे लोकांना घाबरवणे हे अयोग्य असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.
मुक्ताच्या फेसबुक पेजवर अंदाजे १.२५ लाख फॉलोअर्स आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत २० हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.