बेताल कारभाराने चिपळुणातील जनता, लोकप्रतिनिधी, ठेकेदार यांना वेठीस धरणा-या मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या यापूर्वी केलेल्या ठरावावर शनिवारी झालेल्या सभेत सत्ताधा-यांनी शिक्कामोर्तब केले..
चिपळूण- बेताल कारभाराने चिपळुणातील जनता, लोकप्रतिनिधी, ठेकेदार यांना वेठीस धरणा-या मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या यापूर्वी केलेल्या ठरावावर शनिवारी झालेल्या सभेत सत्ताधा-यांनी शिक्कामोर्तब केले. महिला सदस्यांना अपमानास्पद वागणूक देणे, ठेकेदारांची बिले अडविणे, विकासकामांमध्ये अडथळे आणणे अशी अनेक कारणे देत बांधकाम सभापती आशीष खातू यांनी डॉ. पाटील यांच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली. त्यामुळे संतप्त झालेल्या सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांनी मुख्याधिका-यांचा तीव्र शब्दात निषेध केला.
सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे होत्या.
मागील सभेच्या इतिवृत्त मंजुरीवेळी मुख्याधिकारी डॉ. पाटील यांच्याविरोधात करण्यात आलेल्या ठरावाचा मुद्दा चर्चेत आला. बांधकाम सभापती श्री. खातू ठराव मांडतील असे नगराध्यक्षांनी सांगितले. मात्र, त्यावरून उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने नाराज झाले. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सभेत मी ठराव मांडला होता. सेनेच्या गटनेत्यांनी त्याला अनुमोदन दिले होते. याची नोंद इतिवृत्तात असताना पुन्हा ठराव कसा मांडला जाईल? अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर तुम्ही ठराव मांडला नाहीत. सभागृहात पंधरा मिनिटे गोंधळ घातलात.
अचानक सर्वासमोर विषय मांडलात. त्यामुळे तो ठराव होऊ शकत नाही, असा खुलासा सौ. खेराडे यांनी केला. त्यामुळे श्री. भोजने संतापले. तुम्ही अधिनियमाची माहिती घ्या, असे त्यांनी सुनावले. यावरून या दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सेना नगरसेवक मोहन मिरगल, अपक्ष नगरसेवक राजेश केळसकर यांनी नवा ठराव मांडण्यास जोरदार विरोध केला. तेव्हा श्री. खातू जे मुद्दे मांडतील ते मागील ठरावात समाविष्ट करू आणि ठरावावर शिक्कामोर्तब करू, असे स्वीकृत नगरसेवक विजय चितळे यांनी सुचविले. आपल्या विरोधात चाललेली चर्चा पाहून डॉ. पाटील कमालीचे अस्वस्थ झाले. कायद्यातील तरतुदीप्रमाणे निर्णय घ्या, असे त्यांनी सदस्यांना दटावणीच्या सुरात सांगितले.
तेव्हा तुम्ही दमदाटीची भाषा करायची नाही, अशा कडक शब्दात श्री. मिरगल यांनी मुख्याधिका-यांना रोखले. अखेर बांधकाम सभापती श्री. खातू यांनी मुख्याधिका-यांविरोधात आपली भूमिका मांडली. डॉ. पाटील पालिकेत वारंवार गैरहजर राहतात. पूर्वसूचना न देता मुख्यसभेला येणे टाळतात, सदस्यांसोबत वादविवाद करतात. विकासकामांबाबत सदस्यांना योग्य मार्गदर्शन करीत नाहीत. ठेकेदारांची सुरक्षा अनामत रक्कम मुद्दाम रोखतात. झालेल्या कामाचे बिल देण्यासाठी उशीर करतात. सीओंच्या हुकूमशाहीला कंटाळून अनेक कर्मचा-यांनी काम सोडले. मुख्याधिका-यांच्या कारभाराला कंटाळलेले ठेकेदार आम्हाला पालिकेतील कामे नको, म्हणून आपल्याकडे वारंवार पत्रव्यवहार करीत आहेत, असे अनेक मुद्दे खातू यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे डॉ. पाटील यांच्यावर कारवाई करून त्यांची बदली करावी, अशी मागणी खातू यांनी केली. त्यांचे मुद्दे श्री. भोजने यांच्या ठरावात समाविष्ट करण्यात आले.
महिला नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक
मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील हे महिला नगरसेवकांना कशी अपमानास्पद वागणूक देतात याचा पाढा भाजपच्या नगरसेविका सीमा रानडे यांनी सभागृहासमोर वाचला. महिला बालकल्याण सभापती असताना आपण काही कामे मुख्याधिका-यांना सुचविली. पण, महिलांनी अशी कामे करण्यापेक्षा सुतारकाम, लोहारकाम करावे, असा अजब सल्ला डॉ. पाटील यांनी दिला. नगरसेवकांची विचारसरणी जिथे संपते तिथे आमची विचारधारा सुरू होते, अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली असे सौ. रानडे यांनी सभागृहात सांगताच डॉ. पाटील यांचा सर्व नगरसेवकांनी निषेध केला.
[EPSB]
[/EPSB]