सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांनी राजीनामा दिल्यानंतर आता बोर्डाच्या सदस्या इरा भास्कर यांनीही राजीनामा देण्याचे ठरवले आहे.
नवी दिल्ली- मेसेंजर ऑफ गॉड’ चित्रपटाला एफसीएटीकडून परस्पर मंजुरी मिळाल्याने संतापलेल्या सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांनी राजीनामा दिल्यानंतर आता सेन्सॉर बोर्डाच्या सदस्या इरा भास्कर यांनीही राजीनामा देण्याचे ठरवले आहे.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात सिनेमा अभ्यासाच्या प्राध्यापक असलेल्या इरा यांनी आपण आज रात्री राजीनामा पाठवून देणार असल्याचे सांगितले.
डेरा सच्चा सौदाचे बाबा राम रहीम यांच्या ‘मेसेंजर ऑफ गॉड’ चित्रपटाला एफसीएटीकडून परस्पर मंजुरी मिळाल्याने संतापलेल्या सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता इरा भास्कर यांनी राजीनामा देण्याचे ठरवले आहे. हा सिनेमा रविवारी प्रदर्शित होत आहे.
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत बाबा राम रहिम यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा वादात अडकला आहे. राम रहिम यांनी सिनेमात स्वत:ला देव म्हणून सादर केल्यामुळे सेन्सॉर बोर्डाने यावर आक्षेप नोंदवत परवानगी नाकारली होती. मात्र एफसीएटीकडून या चित्रपटाला परस्पर मंजुरी देण्यात आली. यावर नाराजी व्यक्त सॅमसन यांनी आपला राजीनामा दिला.
‘मेसेंजर ऑफ गॉड’ या सिनेमावर धार्मिक भावना भडकवण्याचा आरोप करत अकाली तख्तसह अनेक शिख संघटनांनी यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. बाबा राम रहीम यांच्याविरोधात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अशा व्यक्तीला चित्रपटाद्वारे मोठ केले जाऊ नये, असे शिख संघटनांचे म्हणणे आहे.
या चित्रपटाला परवानगी दिल्यास कायदा-सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ शकते असा इशाराही या संस्थाकडून देण्यात आला होता. या सिनेमामुळे तणाव निर्माण होऊ शकतो, असे मत गृहमंत्रालयानेही नोंदवले होते.