नवी दिल्ली- मुसळधार पावसात गरमा गरम चिकन मोमोज खायला आवडत असेल तर सावधान… कारण चिकन मोमोजमध्ये कुत्र्याचे मांस आढळून आले आहे.
दिल्लीत मोमोजमध्ये भेसळ होत असल्याच्या अनेक तक्रारी येत असल्याने मोमोज दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे दिल्लीत २० मोमोजची दुकाने बंद करण्यात आली.
दिल्लीच्या कँट बोर्डाकडे कँट परिसरातील ७० वेंडिंग झोन आणि काही महत्त्वाच्या दुकानात मोमोजमध्ये मांस भेसळ होत असल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे मोमोजचा दर्जा तपासण्याचे तसेच दर्जा चांगला नसेल तर दुकानदाराचे सामान जप्त करून दुकानाला सिल ठोकण्याचे आदेश देण्यात आले होते.
कँट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेड्डी शंकर बाबू यांच्या आदेशानंतर गोपीनाथ बाजार, सदर बाजार आणि वेंडिंग झोनमधील शेकडो दुकानांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत काही दुकानातील मोमोजमध्ये चिकनऐवजी कुत्र्याचे मांस आढळून आले. तर काही दुकानात मांसचा दर्जा व्यवस्थित नसल्याचे समजले. त्यामुळे २० दुकानांमधील सामान जप्त करून ती दुकाने बंद करण्यात आली आहेत. कँट परिसरातील आर्मी कँटीनमध्ये मोमोज विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे.