जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात आणि नौगाम व रामपूर भागात झालेल्या चकमकीत सात दहशतवादी ठार झाले.
श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात आणि नौगाम व रामपूर भागात झालेल्या चकमकीत सात दहशतवादी ठार झाले. कुपवाडा जिल्ह्यात लष्करी तळावर तीन दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्लेखोर दहशतवाद्यांना लष्कराने कंठस्नान घातले आहे. या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. त्यांच्याकडे पाकिस्तानी खुणा असलेली औषधे सापडली आहेत.
लष्कराच्या अधिका-यांनी सांगितले की, सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कुपवाडा जिल्ह्यायातील लानगेट भागातील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. सुरक्षा दलांनी त्याला प्रत्युत्तर दिले. त्यात तीन दहशतवादी ठार झाले.
या कारवाईबाबत माहिती देताना कर्नल राजीव शारंग म्हणाले की, तळाजवळच्या परिसरातील कुंपणावर तीन दहशतवादी जवानांना दिसले. त्यानंतर दहशतवाद्यांनी जवानांवर मोठय़ा प्रमाणावर गोळीबार केला. त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात तीन दहशतवादी ठार झाले. लष्कराने दहशतवाद्यांकडून शस्त्र व दारूगोळा जप्त केला आहे. तसेच त्यांच्याकडे पाकिस्तानच्या खुणा असलेली औषधे सापडली आहेत. त्यामुळे हे दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे सिद्ध होते. त्यांच्याकडे नकाशाही सापडला असून त्याचे विेषण सुरू आहे. या दहशतवाद्यांकडे चार रेडिओ सेट व तीन जीपीएस यंत्रणा सापडली आहे, असे त्यांनी सांगितले.
या हल्ल्यात अनेक दहशतवादी सहभागी झाले होते का? यावर ते म्हणाले की, तशी शक्यता वाटत आहे. मात्र, केवळ तिघेच दिसले. अन्य दहशतवाद्यांना शोधण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे.
घुसखोरीचे तीन प्रयत्न निष्फळ
पाकव्याप्त काश्मिरातून जम्मू-काश्मीरमध्ये तीन ठिकाणाहून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी लष्कराने गुरुवारी निष्फळ ठरवली. यात चार दहशतवादी ठार झाले. नौगाम विभागात दोन तर रामपूर विभागातून एक घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला.