काँग्रेसप्रणीत यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांनी बुधवारी अर्ज भरला.
नवी दिल्ली- काँग्रेसप्रणीत यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांनी बुधवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्याबरोबर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, ज्येष्ठ काँग्रेस नेता मल्लिकार्जून खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी मीर कुमार यांनी राजघाटवर जाऊन महात्मा गांधी आणि समता स्थळावर जाऊन आपले वडिल स्वर्गीय जगजीवन राम यांना श्रद्धांजली वाहिली.
राष्ट्रपतीपदासाठी १७ जुलै रोजी निवडणूक होणार असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज बुधवार शेवटचा दिवस आहे. मंगळवारपर्यंत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्यासहित ६४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी उपाध्यक्ष राहुल गांधी गैरहजर होते. सुट्टीवर असलेल्या राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांचे कौतूक केले. ‘यूपीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार म्हणून मीरा कुमार यांची निवड झाल्याचा अभिमान वाटतो,’ असेत्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
तसेच ‘मीरा कुमार यांची निवड स्वागतार्ह आहे. कुमार या विभाजनवादी विचारधारेच्या विरोधाचं त्या प्रतीक आहेत. हा देश आणि देशातील जनतेला एकत्र बांधून ठेवण्याच्या तत्वांचं त्या प्रतिनिधित्व करतात,’ असेही राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.