महापालिकेतील माफियाराज व दलालराज उघड करून त्यामागील सत्य समोर आणण्याची मागणी महापौर स्नेहल आंबेकर यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे.
मुंबई- मुंबई महापालिकेत माफिया व दलालांचे राज असल्याचा आरोप भाजपाकडून होत असल्याने शिवसेना अस्वस्थ झाली आहे. आजवर हे आरोप सहन करत झोपेचे सोंग करणा-या शिवसेनेचा स्वाभिमान आता मित्रपक्षाकडूनच होत असलेल्या आरोपांमुळे दुखावला आहे. त्यामुळे महापालिकेतील माफियाराज व दलालराज उघड करून त्यामागील सत्य समोर आणण्याची मागणी महापौर स्नेहल आंबेकर यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यावर शिवसेनेने महापालिकेत आपले माफियाराज असल्याचे मान्य केल्याची चर्चा आहे.
मुंबईतील नालेसफाई व रस्ते व पाणी टँकर घोटाळा, मोकळय़ा मैदानांचा घोटाळा अशाप्रकारचे अनेक घोटाळे समोर येत असून यावर महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपाकडून महापालिकेत माफियाराज सुरू असल्याबद्दल आरोप होत आहेत. महापालिकेतील या घोटाळय़ांची मागणी विरोधी पक्षांप्रमाणे भाजपानेही करून कंत्राटी कामांमधील भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. भाजपाचे खासदार किरीट सोमय्यांकडून महापालिकेतील माफियाराजवरही वारंवार आरोप होत आहेत. भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्याकडून पालिकेतील माफियाराज संपवण्याची भाषा होत आहे. या आरोपांमुळे शिवसेनेचा वाघ घायाळ झाली आहे.
महापौर स्नेहल आंबेकर यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहून महापालिकेच्या सव्वाशे वर्षाच्या इतिहासात प्रशासकीय प्रमुख म्हणून प्रथमच माफियाराज आणि दलालराज असल्याचे गंभीर आरोप होत आहेत. यातील सत्यता मुंबईकरांसमोर आणावी, अशी मागणी आंबेकर यांनी केली. महापालिकेतील पत्रकार परिषदेत् महापौरांनी ही माहिती दिली. यावेळी खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सुनील प्रभू, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे उपस्थित होते. महापौरांच्या माध्यमातून पत्र देवून पुन्हा एकदा बळीचा बकरा बनवला आहे. रस्ते कंत्राट कामांमधील खोदकामांमधील भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी महापौरांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार रस्ते कंत्राट कामांची चौकशी करून त्यातील भ्रष्टाचारही समोर आणला आहे.
माफियाराज मुख्यमंत्र्यांकडेच
महापालिकेतील माफियाराजबाबत आरोप होत असले तरी खरे माफियाराज राज्य सरकारमध्ये आहे. महाराष्ट्रात सध्या गुंड आणि राजकारणावर चर्चा सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एका गुंडासोबतच्या छायाचित्राने खळबळ उडवून दिल्याचे महापौरांनी आपले निवेदन नमूद करत एकप्रकारे मुख्यमंत्र्यांचे माफियाराज सुरू असल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला.