डोंबिवलीच्या मानपाडा भागात झालेल्या बिल्डरच्या बॉडीगार्डच्या हत्याप्रकरणाचे धागेदोरे अखेर मनसेपर्यंत पोहोचले आहेत.
डोंबिवली- डोंबिवलीच्या मानपाडा भागात झालेल्या बिल्डरच्या बॉडीगार्डच्या हत्याप्रकरणाचे धागेदोरे अखेर मनसेपर्यंत पोहोचले आहेत. याप्रकरणात पोलिसांनी मनसेचा ठाण्यात राहणारा कार्यकर्ता आणि अकोला नगरपरिषदेतील मनसेचा उमेदवार राहिलेला राकेश उर्फ राजू अर्जुन हातणकर (४७) याला अटक केली आहे.
या हत्येमागे मनसेचे माजी आमदार रमेश पाटील यांच्यासह त्यांचे भाऊ राजू पाटील आणि विनोद पाटील यांचा हात असल्याचा आरोप संबंधित बिल्डरने केला होता. यानंतर अखेर पोलीस तपासात या हत्येचे मनसे कनेक्शन समोर आले असून आता मोठे मासेही जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटईनाका येथे २१ डिसेंबर रोजी दुपारी हत्या झाली होती. शिवसेनेचा पदाधिकारी असलेल्या अमित पाटील या बिल्डरला मारण्यासाठी दुचाकीवर आलेल्या शूटर्सनी बिल्डर समजून त्याच्या विकी शर्मा या त्याच्या बाऊंसरवर गोळ्या झाडल्या होत्या. यात विकीचा मृत्यू झाला होता. यानंतर शिवसेनेने माजी आमदार पाटील व त्यांच्या भावांना अटक करण्यासाठी पोलीस ठाण्यावर मोर्चाही काढला होता.
या प्रकरणाचा तपास करताना कल्याण गुन्हे शाखेने यापूर्वी नागेश पांडुरंग सोनावळे (२९, रा. ठाणे) आणि अजय उर्फ सोनी किशनकुमार वर्मा (३२, रा. उत्तरप्रदेश) या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मनसे कार्यकर्ता राकेश उर्फ राजू हातणकर याला अटक केली असून तो कुख्यात गँगस्टर अबू सालेमचा हस्तक असल्याचे समजते.
मंगळवारी पहाटे ठाण्याच्या वैती वाडी येथील त्याच्या राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात यापूर्वी ७ मोठ्या हत्याकांडांचे गुन्हे दाखल असून तरीही त्याने काही वर्षांपूर्वी मनसेतर्फे अकोला नगरपरिषदेची निवडणूक लढवली होती. अजूनही तो मनसेचा सक्रीय कार्यकर्ता असल्याचे समजते. त्यामुळे रमेश पाटील, राजू पाटील व विनोद पाटील यांचा या प्रकरणात हात असण्याची शक्यता बळावली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यादिशेने सध्या पोलिसांचा तपास सुरू असून लवकरच सत्य बाहेर येणार आहे.