मुंबईसह दहा महानगरपालिका आणि ११ जिल्हा परिषदांसाठी झालेल्या मतदानात अनेक दिग्गजांनी मतदान केले.
मुंबई- मुंबईसह दहा महानगरपालिका आणि ११ जिल्हा परिषदांसाठी झालेल्या मतदानात अनेक दिग्गजांनी मतदान केले. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील वरवडे येथे मतदान केले. तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आपल्या नातीसह मुंबईत मतदान केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृतासह नागपूर येथे मतदान केले. तर सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर येथे मतदान केले.
मुंबईमध्ये सकाळीच राजकीय दिग्गजांनी मताधिकार बजावला. आतापयर्ंत शिक्षण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुंबईत आपली नात रेवती सुळे हिच्यासह मतदान केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी, मनसे प्रमुख राज ठाकरे, खासदार पूनम महाजन, मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया, महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, पोलीस सहआयुक्त देवेन भारती यांनीही मतदान केले.
याशिवाय अभिनेत्री तथा खासदार रेखा, अभिनेते सुनील बर्वे, रणबीर सिंग, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सोनम कपूर, श्रद्धा कपूर, अनुष्का शर्मा, सुप्रसिद्ध उद्योजक टीना अंबानी, क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी सकाळीच मताधिकार बजावला.
यावेळी मोठया संख्येने मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.नागपुरात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पुण्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, अकोल्यात गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, अमरावतीमध्ये उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, सोलापूरमध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, ठाण्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही सकाळी मतदानाचा हक्क बजावला.