दिल्ली,राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील पराभवानंतर मिझोराम विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.
ऐजॉल- दिल्ली,राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील पराभवानंतर मिझोराम विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. मिझोराम विधानसभेच्या ४०पैकी ३३ जागांवर विजय मिळवत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर मिझो नॅशनल फ्रंटने पाच जागा जिंकल्या आहेत. तर मिझोराम पिपल्स कॉन्फरन्सने एक जागेवर विजय मिळवला आहे.
देशातील चार राज्यांच्या विधानसभा निकालानंतर सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून मिझोराम विधानसभेच्या ४० जागांसाठी मतमोजणीला प्रारंभ झाला.
विद्यमान मुख्यमंत्री लाल थान्हावाला सेरचिप मतदार संघातून ८७० मतांनी विजयी झाले. तर प्रमुख विरोधी पक्ष एमएनएफचे नेते आणि माजी मुख्यमंत्री झोरामथांगा तुईपुई पूर्व मतदार संघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.
मिझोराम हे ख्रिश्चन बहुल राज्य आहे. ख्रिस्ती बांधव रविवारी मोठ्या प्रमाणात चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जातात. त्यामुळे येथील मतमोजणी निवडणूक आयोगाने एक दिवस पुढे ढकलली.
मिझोराम विधानसभेच्या ४० जागांसाठी ८० टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत ११ विद्यमान मंत्री आपले नशीब पुन्हा अजमावत आहेत.
२००८ च्या विधानसभा निवडणुकीत ४० पैकी ३२ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. तर अपक्ष व अन्य पक्षांनी आठ जागांवर विजय मिळवला होता.
मिझोराम विधानसभेसाठी १४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
काँग्रेस- ४०
मिझोराम डोमॅक्रेटीक अलायन्स (एमडीए) – ४०
झोराम नॅशनल पार्टी (झेडएनपी) – ३८
मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) – ३१
भाजप- १७
मिझोराम पिपल्स कॉन्फरन्स(एमपीसी) – ०८
मरालँड डोमॅक्रेटीक फ्रंट (एमडीएफ) – ०१
राष्ट्रवादी काँग्रेस – ०२
जय महा भारत पार्टी (जेएमबी) – ०१
अपक्ष – ०४
(यापैकी सहा महिला उमेदवार आहेत)