हाफिज सईद, ‘लष्कर-ए-तोयबा’ आमच्या डोक्यावरील बोजा असल्याची कबुली पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे.
इस्लामाबाद- हाफिज सईद, ‘लष्कर-ए-तोयबा’ आमच्या डोक्यावरील बोजा असल्याची कबुली पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी आणि त्यांच्या संघटना पाकिस्तानसाठीच नव्हे, तर दक्षिण आशियासाठी डोकेदुखी असल्याचेही त्यांनी म्हटले. ख्वाजा यांनी याआधीही पाकिस्तानात दहशतवादी संघटना सक्रिय असल्याचे म्हटले होते.
न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात ख्वाजा आसिफ सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर प्रश्नोत्तरांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांना ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावर बोलताना ‘तुम्ही ज्या संघटनेचा उल्लेख केलात, त्या संघटनेवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. त्या संघटनेच्या म्होरक्याला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. मात्र या संघटनेवर व्यापक कारवाई व्हायला हवी, या तुमच्या मताशी मी सहमत आहे. या संघटनेविरोधातील कारवाई तीव्र करायला हवी, असे मलाही वाटते’, अशी कबुली ख्वाजा आसिफ यांनी दिली.
पाकिस्तानातील काही लोक आमच्या डोक्यावरील बोजा झाले आहेत. हे लोक एकटय़ा पाकिस्तानसाठीच नाही, तर संपूर्ण दक्षिण आशियासाठी डोकेदुखी ठरत आहेत. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. मीदेखील या मुद्यावर सहमत आहे, असेही ते म्हणाले. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी पाकिस्तानला कट्टरतावाद्यांवरील कारवाई आणखी गरज त्यांनी व्यक्त केली. हाफिज सईद, लष्कर-ए-तोयबा पाकिस्तानसाठी बोजा आहेत, हे मी मान्य करतो. मात्र त्यांचा सामना करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या, असेही त्यांनी सांगितले आहे.
[EPSB]
काबूल हादरले, विमानतळावर रॉकेटचा हल्ला
अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २० ते ३० रॉकेटचा हल्ला करण्यात आला आहे.
[/EPSB]