नवी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यात मोठय़ा प्रमाणात दारूगोळा सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली- नवी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यात मोठय़ा प्रमाणात दारूगोळा सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काडतुसे आणि हातबॉम्बचा यात समावेश असून याच किल्ल्यावरून पंतप्रधान स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या दिवशी देशाला संबोधित करत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
केंद्राच्या अखत्यारितील पुरातत्त्व विभागाने सध्या लाल किल्ल्याच्या साफसफाईचे काम हाती घेतले असून हे काम सुरू असताना एका कोप-यात हा साठा सापडला. हा साठा लपवून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने लाल किल्ला ही अत्यंत महत्त्वाची वास्तू आहे.
२००० साली लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी लालकिल्ल्यात केलेल्या गोळीबारात ३ जवान शहीद झाले होते. त्यानंतर लाल किल्ल्यावर हल्ला करण्याच्या धमक्या अनेकदा देण्यात आल्या असून अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणा-या या वास्तूला अत्यंत कडक सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात किल्ल्याच्या कोपरा न् कोपरा तपासण्यात आल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही हा दारूगोळा त्यांच्या नजरेतून सुटणे, ही सुरक्षिततेतील मोठी चूक असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी अद्याप कुणावरही कारवाई झालेली नाही.