कोलकाता नाईट रायडर्सनी दिल्ली डेअरडेव्हिल्सवर ४ विकेटनी विजय मिळवला.
नवी दिल्ली- आयपीएलच्या दहाव्या हंगामातील सोमवारी झालेल्या पहिल्या लढतीमध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सनी दिल्ली डेअरडेव्हिल्सवर ४ विकेटनी विजय मिळवला. माजी विजेत्यांचा हा सलग तिसरा विजय आहे. मधल्या फळीतील मनीष पांडे (४९ चेंडूंत नाबाद ६९ धावा) आणि युसूफ पठाण (३९ चेंडूंत ५९ धावा) कोलकात्याच्या विजयात चमकले.
१६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची खराब सुरुवात झाली. माजी विजेत्यांची अवस्था ३ बाद २१ धावा अशी झाली. मात्र मनीष पांडे आणि युसूफ पठाणने चौथ्या विकेटसाठी १२ षटकांत ११० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचताना संघाला सावरले. मनीषने ४९ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६९ धावा करताना संघाला ४ विकेट आणि एक चेंडू राखून जिंकून दिले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २० षटकांत ७ बाद १६८ धावा केल्या. सर्वाधिक ३९ धावा सलामीवीर संजू सॅमसनच्या आहेत. त्याच्यानंतर मधल्या फळीतील रिषभ पंतने सर्वाधिक ३८ धावांचे योगदान दिले. दिल्लीने शेवटच्या पाच षटकांत ५७ धावा काढल्या. त्याचे श्रेय रिषभ पंतला जाते. त्याने अवघ्या १६ चेंडूंत २ चौकार आणि ४ षटकारांसह ३८ धावा फटकावल्या.
कोलकात्याचा हा सलग तिसरा विजय आहे. आयपीएल-१०मध्ये विजयाची हॅट्ट्रिक नोंदवणारा तो मुंबई इंडियन्सनंतरचा दुसरा संघ आहे.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स – ७ बाद १६८ (सॅमसन ३९, पंत ३८)
कोलकाता नाईट रायडर्स – १९.५ षटकांत ६ बाद १६९ (पांडे नाबाद नाबाद ६९, पठाण ५९).
सामनावीर : मनीष पांडे.