सिंधुदुर्ग खड्डेमुक्तीऐवजी खड्डेयुक्त सिंधुदुर्ग अशी प्रचिती आता येत असल्याने इथल्या पर्यटनावर यावर्षी मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सिंधुनगरी- सिंधुदुर्ग खड्डेमुक्तीऐवजी खड्डेयुक्त सिंधुदुर्ग अशी प्रचिती आता येत असल्याने इथल्या पर्यटनावर यावर्षी मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये खड्डेमुक्तीची घोषणा करून शासनाकडून दोन कोटी आणल्याचेही जाहीर केले.
मात्र यातील एकही पैसा आला नसल्याचे उघड होताच सोमवारी झालेल्या जि.प. स्थायी समिती सभेत बांधकाम व वित्त सभापती दिलीप रावराणे, स्थायी समिती सदस्य मधुसुदन बांदिवडेकर यांनी चांगलाच समाचार घेतला. या प्रश्नी शासनाचे लक्ष वेधावे व खड्डेमुक्तीसाठी तात्काळ निधी द्यावा, अशी मागणीही सर्व सदस्यांनी केली.
स्थायी समितीची सभा जि.प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, सभापती दिलीप रावराणे, स्थायी समिती सदस्य सतीश सावंत आदी सदस्य उपस्थित होते.
मुंबई-गोवा महामार्गाची चाळण झाली. मागच्या जिल्हा नियोजन समिती सभेत पालकमंत्र्यांनी दोन कोटीचा निधी आणल्याचे व खड्डे बुजवून खड्डेमुक्त जिल्हा करण्याचे जाहीरही केले होते. जिल्हा नियोजन व सभागृहाचे सदस्य मधुसुदन बांदिवडेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी किती आला ते जाहीर करावे, असे सांगताच खड्डे बुजविण्याचा निधी अद्याप मिळाला नसल्याचे अधिका-यांनी सांगितले.