हिंदू मुस्लिम एकतेवर लेख लिहिणा-या एका प्राध्यापिकेला आणि लेखकाला धमकी देण्यात आल्याचा प्रकार केरळमध्ये घडला आहे.
नवी दिल्ली- ‘इस्लाम धर्मात प्रवेश घ्या अन्यथा परिणामांना सामोरे जा’ अशी धमकी पत्राद्वारे आणि सोशल मिडियावर त्यांना देण्यात आली आहे. दोन्ही घटनांची पोलिसांत नोंद झाली असून तपास सुरू आहे.
के.पी. रमनउन्नी हे कोझिकोड येथील रहिवासी आहेत. त्यांनी रमझानच्या काळात हिंदू मुस्लिम एकतेवर लेख लिहिला होता तर एका प्राध्यापिकेने प्रसिद्ध चित्रकार दिवंगत एम.एफ.हुसेन यांनी काढलेले सरस्वतीचे चित्र योग्य असल्याचे म्हटल्यामुळे त्यांना सोशल मिडियावर अॅसिड हल्ला करणार असल्याची धमकी दिली आहे.
लेखक के.पी.रमनउन्नी यांनी लिहिलेल्या लेखामध्ये हिंदू मुसलमानांचे शत्रू नाहीत, असे म्हटले आहे. त्यानंतर त्यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. हे पत्र एका इसलाम संघटनेने दिले आहे. या धमकी पत्रात त्यांना इस्लाम धर्म स्विकारण्यास सांगितला असून त्यासाठी सहा महिन्यांचा अवधी दिला आहे. लवकरच पाच वेळा नमाज पठण करावे लागेल आणि रोजा ठेवण्यासाठी तयार राहण्यास सांगत तु आमच्यापासून जास्त काळ लपून राहू शकत नाही, तुला तीच शिक्षा मिळेल जी इस्लाम न मानणा-यांना दिली जाते, अशी धमकी दिली आहे.
केरळमधीलच वर्मा महाविद्यालयाच्या प्रोफसेर दीपा निसांथ यांनाही हिंदुत्ववादी संघटनांनी धमकी दिली आहे. त्यांनी एसएफआय या विद्यार्थी संघटनेने लावलेल्या पोस्टरचे समर्थन केले होते. यामध्ये एम.एफ.हुसेन यांनी आपल्या चित्रात सरस्वती काढली होती. त्याला दीपा यांनी पाठिंबा दिला होता. या पेंटिगमुळे हिंदूत्ववादी संघटना चिडल्या होत्या. सरस्वती देवीला आक्षेपार्ह स्थिती दाखवून हुसेन यांनी हिंदू धर्माचा अपमान केला आहे, असा दावा या संघटनांनी केला होता. दीपा यांच्या तक्रारीनुसार, फोटोशॉप केलेला त्यांचा एक आक्षेपार्ह अवस्थेतील एक फोटो या संघटनांनी सोशल मीडियावर टाकला आहे.