कल्याण रेल्वे स्थानकाजवळ लोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा कोलमडली.
कल्याण- कल्याण रेल्वे स्थानकाजवळ लोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा कोलमडली. सुदैवाने लोकलचा वेग कमी असल्याने कोणतिही जीवितहानी झाली नाही. ऐन गर्दीच्यावेळी हा अपघात झाल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले.
कल्याणवरून निघालेली ९.४३ कल्याण सीएसटी लोकल पत्री पुलाजवळ अचानक रुळावरुन घसरली. त्यामुळे प्लॅटफॉर्म नंबर १ आणि १ ए वरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मध्य रेल्वे सध्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावते आहे.
लोकलमधील प्रवाशांनी रुळावर उतरुन पुन्हा कल्याण स्थानक गाठल्याने कल्याण स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. घसरलेला डबा बाजुला हटविण्यासाठी एकतास लागू शकतो. त्यानंतर वाहतूक पुर्वपदावर येईल.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवसाची सुरूवात मध्य रेल्वेच्या रखडपट्टीने झाली आहे. खर्डीजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे कसा-याहून आसनगावपर्यंत वाहतूक ठप्प झाल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती. त्यात हा दुसरा अपघात झाल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.