शेत विकून हॉटेल सुरू करण्याच्या प्रयत्नात असणा-या एका गरीब कष्टक-याच्या अख्ख्या कुटुंबाचीच हत्या करण्यात आली.
जळगाव- शेत विकून हॉटेल सुरू करण्याच्या प्रयत्नात असणा-या एका गरीब कष्टक-याच्या अख्ख्या कुटुंबाचीच हत्या करण्यात आली. हॉटेल सुरू करायच्या आदल्या रात्रीच हे हत्याकांड जळगावजवळील भादली गावात घडले. सामूहिक हत्याकांडाच्या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. हत्येचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट असून या घटनेचा पोलीस तपास सुरु आहे.
रविवारी रात्री कुटुंबातील सदस्यांची कर्त्यां पुरुषासह अज्ञात व्यक्तींनी हत्या केली. प्रदीप भोळे (४५) यांच्यासह त्यांच्या पत्नी संगीता (३५), मुलगी दिव्या (८) आणि मुलगा चेतन(५) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
भादली गावातील भोळेवाडा येथे एका छोटय़ाशा घरात प्रदीप भोळे त्यांच्या कुटुंबासह राहत होते. भोळे कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. त्यांची जमीन नुकतीच त्यांनी साडेपाच लाख रुपयांत विकली. या पैशातून ते हॉटेलचा व्यवसाय सुरू करणार होते. सोमवारी त्यांच्या हॉटेलचा शुभारंभ होणार होता. मात्र रविवारी रात्री सारे होत्याचे नव्हते झाले.
संपूर्ण कुटुंबाची हत्या झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या प्रकरणी तपास सुरू आहे. हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र संपत्तीच्या वादातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.