इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे आणि तितक्याच आंतरराष्ट्रीय टी-२० लढतींच्या मालिकेसाठी भारताच्या संघाची घोषणा शुक्रवारी (६ जानेवारी) केली जाणार आहे.
मुंबई- इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे आणि तितक्याच आंतरराष्ट्रीय टी-२० लढतींच्या मालिकेसाठी भारताच्या संघाची घोषणा शुक्रवारी (६ जानेवारी) केली जाणार आहे. नियोजित कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडल्याने वनडे आणि टी-२० क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी कसोटी कर्णधार विराट कोहलीकडे सोपवली जाईल. त्याचीही अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.
वनडे आणि टी-२० कर्णधारपद सोडले तरी खेळत राहणार असल्याने धोनीचा दोन्ही संघांतील समावेश कायम असेल. यापुढे तो फलंदाज आणि यष्टिरक्षकाच्या भूमिकेत दिसेल. तब्बल ७७ दिवसांनी क्रिकेट खेळणा-या धोनीचे २०१७ चँपियन्स ट्रॉफी स्पर्धेतील स्थान या मालिकेतील कामगिरीवर अवलंबून राहील. वनडे उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा हे दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाहीत. तंदुरुस्त असल्यास डावखुरा सलामीवीर शिखर धवनला संघात स्थान दिले जाईल. कर्नाटकच्या लोकेश राहुलसह तो डावाची सुरुवात करेल. दुखापतीमुळे लोकेश हा न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळू शकला नव्हता.
अजिंक्य रहाणेच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत विक्रमी त्रिशतक ठोकणा-या करुण नायरचा मधल्या फळीत प्रवेश नक्की वाटतो. मनीष पांडे आणि केदार जाधवचा संघातील स्थान अबाधित राखतील. गोलंदाजीत ऑफस्पिनर आर. अश्विनच्या समावेशाबाबत संदिग्धता आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विश्रांती मिळावी म्हणून त्याला न्यूझीलंडविरुद्ध विश्रांती देण्यात आली होती. मात्र दुखापतीमुळे तो रणजी स्पर्धेत खेळू शकला नाही. कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी करणारा नवोदित ऑफस्पिनर जयंत यादव हा दुखापतीमुळे यापूर्वीच मालिकेबाहेर फेकला गेला आहे. न्यूझीलंडविरुद्ध डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाला विश्रांती देताना अक्षर पटेलला संधी देण्यात आली होती. मात्र इंग्लंडविरुद्ध दोघांनीही संघात स्थान मिळेल. लेगस्पिनर अमित मिश्रा हा तिसरा फिरकीपटू असेल.
प्रमुख मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शामी दुखापतीमुळे वनडे आणि टी-२० मालिकेला मुकला आहे. धवल कुलकर्णीही दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे अनुभवी इशांत शर्मासह रणजी करंडक स्पर्धेत प्रभावी गोलंदाजी करणारा जसप्रीत बुमरा तसेच उमेश यादववर मध्यमगती मा-याची भिस्त आहे. अष्टपैलू हार्दिक पंडय़ाला संधी मिळू शकते. कसोटी मालिकेत दुखापतग्रस्त झाला तरी डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धेत तो खेळतोय.