‘ब्लू व्हेल’ या जीवघेण्या गेमच्या आहारी जाऊन एका शाळकरी विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
भोपाळ- ‘ब्लू व्हेल’ या जीवघेण्या गेमच्या आहारी जाऊन एका शाळकरी विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदोरमध्ये सातवीत शिकणारा मुलगा शाळेच्या इमारतीवरून उडी मारत असताना त्याच्या वर्गमित्रांनी त्याला वाचवले आहे.
इंदोर शहरातील चमेली देवी पब्लिक शाळेमध्ये हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या पन्नास दिवसांपासून हा विद्यार्थी आपल्या वडिलांच्या मोबाईलमध्ये ब्लू व्हेल गेम खेळत होता. या खेळाचे सगळे टप्पे त्याने पार केले होते. शेवटच्या टप्प्यात त्याला आत्महत्या करण्याचे आव्हान होते आणि त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
शाळा इमारतीच्या तिस-या मजल्यावरून तो उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याच्या वर्गमित्र आणि शिक्षकांमुळे त्या मुलाचा जीव वाचला.
ब्लू व्हेल गेमसंदर्भातील ही देशातली तिसरी घटना आहे. सोलापूरच्या एका चौदा वर्षीय मुलाने ब्लू व्हेल खेळाचे आव्हान स्वीकारून घर सोडले. या गेममधील एका आव्हानामुळे हा शाळकरी मुलगा सोलापूर बसस्थानक भागातून पुण्याकडे निघाला. पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचल्याने पोलिसांकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर या मुलाला भिगवण बसस्थानकातून पोलिसांनी ताब्यात घेतले.
गेल्याच आठवड्यात अंधेरी पूर्वेकडील ‘शेर ए पंजाब’ वसाहतीत राहणा-या मनप्रीत सिंग या चौदा वर्षांच्या विद्यार्थ्यांने गच्चीच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. त्यालाही ब्लू व्हेल खेळाचं व्यसन लागलं होतं तेव्हा ब्लू व्हेल खेळामुळेच त्यानं आत्महत्या केली असा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता.