भारताच्या आण्विक इंधन पुरवठादार गटाच्या एनएसजी सदस्यत्वास आंतरराष्टीय पातळीवर मान्यता मिळणारच, असा विश्वास परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी रविवारी व्यक्त केला.
नवी दिल्ली- भारताच्या आण्विक इंधन पुरवठादार गटाच्या एनएसजी सदस्यत्वास आंतरराष्टीय पातळीवर मान्यता मिळणारच, असा विश्वास परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी रविवारी व्यक्त केला. या गटात सहभागासाठी चीनचा भारताला विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
चीनकडून एनएसजी पाठिंब्यासाठी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी १६ ते १७ जूनदरम्यान बीजिंग दौरा केल्याचे समजते. भारताला याच वर्षी एनएसजीचे सदस्यत्व मिळावे, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे स्वराज यांनी रविवारी नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
४८ राष्ट्रांत भारताला एनएसजी सदस्यत्व मिळावे, यासाठी निकष आणि कार्य प्रक्रियेविषयी चर्चा सुरू आहे. भारताकडून चीनला समजावण्यात आम्ही यशस्वी ठरू, असा विश्वासही स्वराज यांनी व्यक्त केला.
चीनकडून भारताला एनएसजी सदस्यत्व मिळण्याबाबत होणारा विरोध हा काही कार्य प्रक्रिया आणि निकषांचा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी आपल्या दोन वर्षाच्या परराष्ट्रमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेल्या चांगल्या कामाचा लेखाजोखा मांडला. भारताला याच वर्षी एनएसजी सदस्यत्व मिळेल, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. एनएसजीची परिषद येत्या २३ ते २४ जून रोजी दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे होत आहे.
परराष्ट्र सचिवांचा अघोषित चीन दौरा
परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी १६ ते १७ जूनदरम्यान कोणतीही घोषणा न करता बीजिंग दौरा केला. या दौ-यात त्यांनी भारताला एनएसजी सदस्यत्व मिळण्यासाठी चीनकडून पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न केले.
२४ जून रोजी सेऊल येथे होणा-या ४८ राष्ट्रांच्या परिषदेत भारताला एनएसजी सदस्यत्व देण्यावर चर्चा होणार आहे. चीनसोबत एनएसजी सदस्यत्वबाबत बोलणी करण्यासाठी परराष्ट्र सचिवांनी दौरा केल्याबदल परराष्ट्र सचिव मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दुजोरा दिला आहे.