पनामा पेपर प्रकरणी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली- पनामा पेपर प्रकरणी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आयकर विभागाकडून या प्रकरणाची चौकशी वेगाने करण्यात येत आहे.
आयकर विभागाने पनामा प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असून या प्रकरणातील पुरावे आणि माहिती गोळा करण्यासाठी कॅरेबियन द्वीप समूहावरील ब्रिटीश वर्जिन आयलँडवर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या एका अधिका-याला पाठविण्यात आले आहे. तसेच पनामा पेपर्स प्रकरणी ३३ जणांविरोधात खटला भराला असून इतरांची चौकशीही सुरू केली आहे.
पनामा पेपर्स प्रकरणात अमिताभ यांचे नाव आल्यानंतर त्यांनी कोणतेही चुकीचे काम केले नसल्याचे स्पष्ट केले होते. भारतीय नियमांनुसारच विदेशात पैसा पाठविल्याचा दावा अमिताभ यांनी केला होता. त्याचप्रमाणे पनामा पेपर्स प्रकरणातील कंपन्यांशीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
मध्य अमेरिकेतील पनामा या कर नंदनवन म्हणून ओळखल्या जाणा-या देशातील ‘मोझॅक फॉन्सेका’ या कायदा सल्लागार कंपनीची ११.५ दशलक्ष गोपनीय कागदपत्रे उघड झाली होती. जगभरातील राजकारणी, उद्योगपती, व्यावसायिक, चित्रपट कलावंत, क्रीडापटूंनी मालमत्ता लपवण्यासाठी, कर चुकवण्यासाठी आणि अन्य लाभांसाठी पनामा, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, जर्सी, बहामा आणि सेशेल्स बेट या देशांमध्ये बोगस कंपन्यांमार्फत पैसा गुंतवल्याचे समोर आले होते.
भारतातील ५०० जणांची नावे होते. यात अमिताभ बच्चन यांच्यासह के. पी. सिंग, समीर गेहलोत यांच्यासारख्या दिग्गज लोकांचा समावेश होता. नवाझ शरीफ यांच्यावरील कारवाईनंतर भारतातही पनामा पेपरप्रकरणातील संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत होती.