गुजरातमधील ४२ काँग्रेसच्या आमदारांना लपवून ठेवणा-या कर्नाटकातील रिसॉर्टवर आयकर विभागाने छापा टाकला आहे.
बंगळुरू- गुजरातमधील ४२ काँग्रेसच्या आमदारांना लपवून ठेवणा-या कर्नाटकातील रिसॉर्टवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. हे रेसॉर्ट कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मालकीचे आहे.
कर्नाटकचे उर्जामंत्री डी के शिवकुमार यांच्याशी संबंधित ३९ ठिकाणी बुधवारी आयकर विभागाने छापेमारी केली. शिवकुमार यांच्या मालकीच्या इगलटन नावाच्या रिसॉर्टचाही समावेश आहे. याच शिवकुमारांच्या याच रिसॉर्टमध्ये गुजरातच्या ४२ काँग्रेस आमदार गेल्या चार दिवसापासून मुक्कामाला आहेत.
आठ ऑगस्ट रोजी होणा-या गुजरात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील गळती थांबविण्यासाठी या ४२ आमदारांना बंगळुरूतील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. भाजपाने राजकीय फायद्यासाठी ही कारवाई केल्याचे मत काँग्रेसकडून व्यक्त होत आहे.