हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वाणीला पाकिस्तानने शुक्रवारी शहीद घोषित केले.
लाहोर- हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वाणीला पाकिस्तानने शुक्रवारी शहीद घोषित केले. त्याच्या मृत्यूनिमित्त येत्या १९ जुलै रोजी काळा दिवस पाळण्याचे पाकिस्तानने जाहीर करून दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे दाखवून दिले. काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानने शुक्रवारी कॅबिनेटची विशेष बैठक बोलवली. काश्मिरींची चळवळ ही स्वातंत्र्याची चळवळ आहे. संपूर्ण पाकिस्तान काश्मिरी जनतेच्या बाजूने आहे.
काश्मिरींना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी नैतिक, राजकीय व राजनैतिक स्तरावर प्रयत्न करू, असा आगाऊपणा शरीफ यांनी केला.
काश्मीरचा मुद्दा जागतिक स्तरावर ठळकपणे मांडा, असे आदेश शरीफ यांनी सर्व संबंधित विभागांना दिले आहेत. तसेच १९ जुलै हा काळा दिवस पाळण्याची अधिसूचना पाकिस्तान सरकारने काढली आहे.
तसेच काश्मीरबाबत पाकिस्तानी संसदेचे अधिवेशन भरवण्याचे शरीफ यांनी जाहीर केले. आफ्रिकेच्या व पश्चिम आशियातील सर्व राजदूतांना काश्मीरमधील परिस्थितीची माहिती देण्याचा आगाऊपणा पाकिस्तानने केला.