श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुस-या कसोटीच्या दुस-या दिवशी शुक्रवारी तब्बल २१ विकेट पडल्या.
गॉल- श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुस-या कसोटीच्या दुस-या दिवशी शुक्रवारी तब्बल २१ विकेट पडल्या. यजमानांनी ठेवलेल्या ४१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दुस-या दिवसअखेर पाहुण्यांची अवस्था २ बाद २५ धावा अशी झाली आहे. जगज्जेत्या ऑस्ट्रेलियासमोर सलग दुस-या पराभवाचे संकट आहे.
ऑस्ट्रेलियाची फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. डावखुरा फिरकीपटू रंगना हेरथने पहिल्याच षटकात सलामीवीर ज्यो बर्न्सला (२) माघारी धाडले. त्यानंतर ऑफस्पिनर दिलरुवन परेराने वैयक्तिक दुस-या आणि डावातील चौथ्या षटकात ‘नाईट वॉचमन’ नॅथन लियॉनसह (०) उस्मान ख्वाजाला (०) लागोपाठच्या चेंडूंवर बाद करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद १० धावा अशी केली.
सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (खेळत आहे २२) संयमी फलंदाजी केली. त्याच्यासह कर्णधार स्टीव्हन स्मिथवर (खेळत आहे १) ऑस्ट्रेलियाची भिस्त आहे. मात्र ३८८ धावांची पिछाडी आणि तब्बल तीन दिवस शिल्लक असल्याने पाहुण्यांसमोर पराभवाचे संकट आहे.
पहिल्या डावात १७५ धावांची आघाडी घेतलेल्या श्रीलंकेने दुस-या डावात २३७ धावा केल्या.
आघाडी फळी कोसळल्याने ३ बाद ३१ धावा अशा बिकट अवस्थेतील यजमानांना अष्टपैलू दिलरुवन परेरा (६४), कर्णधार अँजेलो मॅथ्यूज (४७), कुशल परेरा (३५) आणि धनंजय डिसिल्वामुळे (३४) श्रीलंकेला अडीचशेच्या घरात झेप घेता आली. तसेच प्रतिस्पध्र्यासमोर ४१३ धावांचे लक्ष्य ठेवता आले. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने दुस-या डावात ६ विकेट घेत सामन्यात ११ विकेट घेण्याची करामत साधली.
तत्पूर्वी, २ बाद ५४ धावांवरून ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०६ धावांत संपला.
पाहुण्यांची श्रीलंकेविरुद्धची ही सर्वात कमी धावसंख्या ठरली. डावखुरा रंगना हेरथ आणि ऑफस्पिनर दिलरुवन परेराने प्रत्येकी चार विकेट घेत प्रतिस्पध्र्याना पहिल्या सत्रातच गुंडाळले. पाहुण्यांतर्फे केवळ तीन फलंदाजांना तीन आकडी धावा करता आल्या. त्यात सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे (४२) सर्वाधिक योगदान आहे. त्याच्यानंतर मधल्या फळीतील मिचेल मार्शच्या (२७) सर्वाधिक धावा आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या अॅडम वोग्जसह (८) पीटर नेविल (०) आणि मिचेल स्टार्कला (०) लागोपाठच्या चेंडूंवर बाद करत हेरथने हॅट्ट्रिक नोंदवली. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो श्रीलंकेचा केवळ दुसरा गोलंदाज आहे.
श्रीलंकेतर्फे दुस-या हॅट्ट्रिकची नोंद
हेरथच्या रूपाने श्रीलंकेतर्फे कसोटीत दुस-या हॅट्ट्रिकची नोंद झाली. त्याच्यापूर्वी १९९९ मध्ये मध्यमगती गोलंदाज नुवान झोयसाने हरारे कसोटीत झिम्बाब्वेविरुद्ध हॅट्ट्रिकची करामत साधली होती. तब्बल १७ वर्षानी श्रीलंकेच्या गोलंदाजाला अशी किमया साधता आली.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया – १०६ आणि ३ बाद २५(वॉर्नर खेळत आहे २२, परेरा ९-२) विरुद्ध श्रीलंका – २८१ आणि २३७(दिलरुवन परेरा ६४, मिचेल स्टार्क ५०-६).