सोशल नेटवर्किंगमध्ये जगात अग्रभागी असणा-या फेसबुकवरील सक्रिय वापरकर्त्यांची संख्या तब्बल २०० कोटींवर पोहोचली आहे.
पालो ऑल्टो (कॅलिफोर्निया)- सोशल नेटवर्किंगमध्ये जगात अग्रभागी असणा-या फेसबुकवरील सक्रिय वापरकर्त्यांची संख्या तब्बल २०० कोटींवर पोहोचली आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश एवढी ही संख्या आहे.
फेसबुकचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी मंगळवारी फेसबुकवरून ही माहिती जाहीर केली.
‘‘मंगळवारी सकाळपर्यंत फेसबुक समुदाय हा आता अधिकृतपणे २०० कोटी लोकांचा झाला आहे. जगाला जोडण्यात आम्ही प्रगती करत आहोत,’’ असे त्यांनी सांगितले.
फेसबुक युजर्सची संख्या १०० कोटींवरून २०० कोटी होण्यास ५ वर्षे लागली. आम्ही ऑक्टोबर २०१२ मध्ये १०० कोटींचा टप्पा गाठला होता, असे झुकेरबर्ग यांनी सांगितले.
आम्हाला जगातील प्रत्येकाला जोडण्यासाठी मोठा पल्ला गाठायचा आहे. परंतु, लोकांना केवळ एकमेकांशी जोडण्याव्यतिरिक्त खूप काही करायला हवे. आपण त्यांना एकमेकांच्या जवळ आणायला हवे, असे झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे.
इंटरनेट जगतातील दिग्गज फेसबुकच्या या प्रगतीमध्ये अनेक छोटय़ा छोटय़ा कम्युनिटींनी हातभार लावल्याचे उपाध्यक्ष नाओमी ग्लीट यांनी सांगितले.