डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याची दत्तक मुलगी हनीप्रीत सिंगविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
नवी दिल्ली- डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याची दत्तक मुलगी हनीप्रीत सिंगविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. हनीप्रीत सिंग सध्या फरार असून हरियाणा पोलिसांनी ही नोटीस जारी केली आहे. न्यायालयाने गुरमीत राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर त्याला पळवून नेण्याचा कट आखल्याचा आरोप हनीप्रीत सिंगवर करण्यात आला आहे. पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली असल्याने हनीप्रीत सिंग देश सोडून जाऊ शकत नाही.
पोलिसांनी डेरा सच्चा सौदाचा प्रवक्ता आदित्य इन्साविरोधातही अशीच नोटी जारी केली आहे. राम रहीमला दोषी ठरवण्यात आल्यानंतर हिंसा भडकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे. काहीजणांनी हनीप्रीत फरार असल्याचे सांगितले आहे. तर काही रिपोर्टनुसार, रोहतकमधील एका अनुयायाच्या घरात ती राहत आहे.
राम रहीमला बलात्काराच्या आरोपात दोषी ठरवल्यानंतर न्यायालयाच्या आवारातून पळवून नेण्याचा तसेच हिंसा भडकवल्याचा आरोप हनीप्रीतवर आहे, अशी माहिती हरियाणाचे पोलीस उपायुक्त मनबीर सिंग यांनी दिली आहे. पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला असून आदित्य हा मुख्य आरोपी आहे. राम रहीमच्या समर्थकांना भडकवण्यामध्ये आदित्यचा मुख्य हात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. बाबा राम रहीम याला बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आल्यानंतर हिंसा भडकली होती. यामध्ये ३८ जणांचा मृत्यू झाला होता. तर करोडोंच्या संपत्तीचे नुकसान झाले होते.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीप्रीत आणि आदित्य या दोघांनाही राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीची कल्पना होती. दरम्यान, राम रहीमला कारागृहात नेण्यात येत असताना वापरण्यात आलेल्या हेलिकॉप्टरमध्ये हनीप्रीतला बसण्याचा परवानगी कशी काय देण्यात आली, याचा तपास हरियाणा सरकार करत आहेत. बाबा राम रहीमला न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये हनीप्रीत सोबत असल्याचे दिसत होते. हेलिकॉप्टरमध्येही ती सोबतच होती.
[EPSB]
खाकी वर्दी जाणार, पोलीस स्मार्ट होणार!