बलात्कारी बाबा राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत इंसाकडून अखेर पोलिसांनी सत्य वदवून घेतलं. पंचकुला हिंसाचाराच्या कटात सहभागी असल्याची कबुली हनीप्रीतने दिली आहे.
चंदीगड- बलात्कारी बाबा राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत इंसाकडून अखेर पोलिसांनी सत्य वदवून घेतलं. पंचकुला हिंसाचाराच्या कटात सहभागी असल्याची कबुली हनीप्रीतने दिली आहे. २५ ऑगस्ट रोजी बलात्कारी बाबा गुरमीत राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर, पंचकुलातील हिंसाचार माझ्या इशा-यावरच झाल्याचे हनीप्रीतने पोलीस कोठडीत कबूल केले आहे. या हिंसाचारात ३६ जणांचा मृत्यू झाला होता. आधी पंचकुला हिंसाचारासाठी सव्वा कोटी रुपये वाटल्याचंही तिने मान्य केले होते.
पंचकुला हिंसाचारासाठी नकाशा
पोलिसांच्या माहितीनुसार, हनीप्रीतनेच देशविरोधी व्हीडिओ बनवून व्हायरल केला होता. बाबाला शिक्षा झाली तर जगाच्या नकाशावरुनच भारताचे अस्तित्वच मिटवून टाकू, अशी घोषणाबाजी या व्हीडिओमध्ये आहे. हा पुरावा हनीप्रीतच्या मोबाईलमध्ये आहे. पंचकुलामध्ये हिंसाचार करण्यासाठी हनीप्रीतने ठरवलेला नकाशा लॅपटॉपमध्ये आहे. पंचकुला शहराचा हा नकाशा असून त्यात बाबाला कोणत्या मार्गाने पळवता येईल, याचे प्लॅनिंगही होते.
कोण आहे हनीप्रीत?
हनीप्रीत ही गुरमीत राम रहीमची दत्तक मुलगी असल्याचे म्हटले जाते. हनीप्रीतचे खरे नाव प्रियांका तनेजा आहे. तिचे वडील रामानंद तनेजा आणि आई आशा तनेजा फतेहाबादचे रहिवासी आहेत. हनीप्रीतचे वडील राम रहीमचे अनुयायी होते. आपली सर्व संपत्ती विकल्यानंतर ते डेरा सच्चा सौदामध्ये दुकान उघडले. १४ फेब्रुवारी १९९९ मध्ये हनीप्रीत आणि विश्वास गुप्ताचे सत्संगमध्ये लग्न झाले होते. यानंतर बाबाने हनीप्रीतला स्वत:ची तिसरी मुलगी घोषित केले. परंतु बाबा आणि हनीप्रीतमध्ये अनैतिक संबंध असल्याचा आरोप तिचा पती विश्वास गुप्ताने केला आहे. दरम्यान, राम रहीमच्या सिनेमात तिने अभिनय आणि दिग्दर्शनही केले आहे.