बलात्कार प्रकरणी दोषी ठरलेला ‘डेरा सच्चा सौदा’चा गुरमित राम रहीम सिंग याला तुरुंगात व्हीआयपी सुविधा दिल्याचे वृत्त आहे.
नवी दिल्ली- बलात्कार प्रकरणी दोषी ठरलेला ‘डेरा सच्चा सौदा’चा गुरमित राम रहीम सिंग याला तुरुंगात व्हीआयपी सुविधा दिल्याचे वृत्त आहे. मात्र तुरुंग प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
बाबा राम रहीम सिंग याला तुरुंगात एसी खोलीत ठेवण्यात आले असून त्याला एक मदतनीस देण्यात आला आहे. तसेच त्याची अन्य कैद्यांपासून वेगळी खास व्यवस्था करण्यात आली आहे. राम रहीमला तुरुंगात पिण्यासाठी मिनरल वॉटरचे पाणी तसेच बाहेरुन जेवण मागवण्याची मुभा दिली जात असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
हरयाणाचे तुरुंग अधिकारी के. पी. सिंह यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून त्याला अशा कोणत्याही सुविधा पुरवल्या नाहीत, अशी माहिती दिली. साध्वी बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेला गुरमीत राम रहीम एक सामान्य कैदीच असून त्याला एसी, मदतनीस अशी चैनीची कोणतीही सुविधा दिलेली नाही, असे त्यांनी सांगितले.
१५ वर्षांपूर्वीच्या बलात्कार प्रकरणात बाबा राम रहीम याला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले. बाबा राम रहीमला हेलिकॉप्टरने रोहतकमधील तुरुंगात नेण्यात आले. बलात्कार प्रकरणातील दोषीला हेलिकॉप्टरने तुरुंगात नेल्याने आधीच नाराजी व्यक्त होत आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी हा निर्णय घेतला होता, असा खुलासा नंतर करण्यात आला.