कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयात गुरूवारी विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) दाखल आरोपपत्रात डॉ. वीरेंद्र तावडे आणि अन्य जणांवर पानसरे यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.
कोल्हापूर- कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयात गुरूवारी विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) दाखल आरोपपत्रात डॉ. वीरेंद्र तावडे आणि अन्य जणांवर पानसरे यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. येरवडा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेल्या तावडे याच्या पोलीस कोठडीतही या प्रकरणी चौकशीसाठी ९ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
याशिवाय, डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणात समावेश असलेल्या विनय पवारचाही कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येतही सहभाग असल्याचा दावा करण्यात आला आहे. कॉम्रेड पानसरे यांच्यावरील हल्ल्यासाठी विनय पवारने टेहळणी केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शीकडून करण्यात आला आहे.
यापूर्वी केंद्रीय अन्वेषण विभागाने डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी पुण्यातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिका-यांकडे सादर केलेल्या आरोपपत्रात वीरेंद्र तावडेचा मुख्य आरोपी म्हणून उल्लेख केला होता. डॉ. वीरेंद्र तावडे हाच मुख्य सूत्रधार असून सारंग अकोलकर आणि विनय पवार या साथीदारांच्या मदतीने तावडेने ही हत्या घडविली,असे या आरोपपत्रात म्हटले होते. अकोलकर आणि पवार हे दोघेदेखील ‘सनातन’चेच साधक असून मडगाव बॉम्बस्फोटातही हात असलेला अकोलकर हा फरारी आहे.
येरवडा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेल्या तावडेचा कोल्हापूरमधील कामगार चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणातही हात असल्याचा संशय कोल्हापूर पोलिसांना होता. त्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी तावडेचा ताबा गेल्या आठवडय़ात घेतला होता. पानसरे हत्येतील संशयित समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्यानंतर तिसरा संशयित सनातनचा साधक व तावडेचा साथीदार विनय पवार याला पोलिसांनी आरोपी केले आहे.
कॉ. पानसरे हत्येपूर्वी पवारने केली होती टेहळणी
सनातन संस्थेचा साधक असलेला सातारा जिल्ह्यातील उंब्रज (ता. कऱ्हाड) येथील संशयित व फरार विनय बाबुराव पवार याने कोल्हापुरातील सागरमाळ परिसरात पानसरे हत्येपूर्वी टेहळणी केली होती. त्याला प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
गुरुवारी पानसरे हत्येतील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र सिंह तावडे याला कसबा बावडा येथील न्यायसंकुलमधील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तथा दिवाणीस्तर यु. बी. काळपागर यांच्या न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे व तपास अधिकारी तथा अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी हा युक्तिवाद केला.