वर्षानुवर्षे भंगार गाडय़ा, अनधिकृत पार्किंग, गर्दुल्यांचा अड्डा बनलेल्या आणि येणा-या-जाणा-या नागरिकांसाठी मनस्ताप ठरलेल्या नितीन कंपनीजवळील पुलाखाली आता रंगीबिरंगी फुलांचे उद्यान, विविध खेळांच्या सुविधा, नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक, बालगोपालांसाठी खेळणी आणि लक्ष वेधून घेणारी आकर्षक विद्युत रोषणाई आदी विविध सुविधांनी एखाद्या नंदनवनासारखी फुलली आहे.
ठाणे- वर्षानुवर्षे भंगार गाडय़ा, अनधिकृत पार्किंग, गर्दुल्यांचा अड्डा बनलेल्या आणि येणा-या-जाणा-या नागरिकांसाठी मनस्ताप ठरलेल्या नितीन कंपनीजवळील पुलाखाली आता रंगीबिरंगी फुलांचे उद्यान, विविध खेळांच्या सुविधा, नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक, बालगोपालांसाठी खेळणी आणि लक्ष वेधून घेणारी आकर्षक विद्युत रोषणाई आदी विविध सुविधांनी एखाद्या नंदनवनासारखी फुलली आहे.
शहरातील आणि शहराच्या बाहेर जाणा-या वाहनांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून २००४ या कालावधीत नितीन कंपनी, तीन हात नाका आणि कॅडबरी येथे तीन उड्डाणपूल बांधण्यात आले होते. कमी अधिक फरकाने सर्वच उड्डाण पुलांखाली भंगार गाडय़ा, अनधिकृत पार्किंग, गर्दुल्यांचा अड्डा आदी कारणांसाठी वापरण्यात येत होती. यामुळे नागरिकांसाठी मनस्तापही सहन करावा लागत असे. काही वेळा या जागेत सिग्नलवरील भिकारी शौचासाठीही वापरत असे.
या जागेचा वापर चांगल्या कारणांसाठी आणि नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी कसा करता येईल याचा विचार करून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर आणि पालिकेच्या सर्व पदाधिका-यांशी चर्चा करून वर्षानुवर्षे भंगारची जागा ठरलेल्या जागेत नंदनवन फुलविण्याचा निर्णय घेतला. याबाबत त्यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिका-यांशी चर्चा केली, पत्रव्यवहार केला आणि या प्रकल्पाला परवानगी मिळवली. तिथे कोणत्या सुविधा नागरिकांसाठी देता येतील याच्यावर जयस्वाल यांनी अनेकवेळा चर्चा करून त्याचा अंतिम आराखडा तयार केला. साधारणत: दिवाळीच्या आधी ठाणेकरांना या सुविधांचा लाभ घेता येईल अशा पद्धतीने त्याचे नियोजन केले आणि आज नितीन कंपनीच्या उड्डाण पुलाखाली दृष्ट लागावी असे सुशोभीकरण करण्यात आले.
अतिशय सूत्रबद्ध आणि सुशोभित करण्यात आलेल्या या पुलाच्या लांबलचक जागेत आता ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण, ४०० मीटरचा जॉगिंग ट्रॅक, कॅडबरी ब्रीजच्या खाली ७०० मीटरचा सायकल ट्रॅक, बच्चे कंपनीसाठी आकर्षक खेळणी, संध्याकाळी जॉगिंग ट्रॅकवर फेरफटका मारण्यासाठी गेल्यानंतर खाण्याचा मोह झाल्यास त्यासाठी फुड कोर्ट, आकर्षक उद्यान, रंगीबिरंगी फुलांची नजरेच्या टप्प्यात सामावणारी आकर्षक माळ, लॉन टेनिस, पिकल बॉल, मलखांब, स्केटिंग, स्केट बोर्ड, अत्याधुनिक स्वरूपाची क्लायबिंग वॉल, महिला आणि पुरुषांसाठी शौचालय आदी सुविधांमुळे शहराच्या मध्यवस्तीत असणारी ही जागा नागरिकांसाठी मोक्याचे ठिकाण बनणार आहे.या सर्व सुविधांना आकर्षक विद्युत रोषणाईने सुशोभित करण्याचे काम केल्यामुळे रात्रीच्या वेळेस पुलाखालील दृष्य दृष्ट लागण्यासारखे दिसते. महापालिकेने एकही पैसा खर्च न करता जाहिरातीचे अधिकार देऊन निर्माण करण्यात आलेल्या या सुविधांमुळे ही दिवाळी ठाणेकरांसाठी नवलाईची ठरणार आहे.
[EPSB]
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोटय़वधींचा सेवाकर घोटाळा
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांशी हातमिळवणी करून प्रशासनाने कोटय़वधी रुपयांच्या सेवाकर वसुलीवर पाणी सोडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
[/EPSB]