बंगळुरूमध्ये शाळेतील सुरक्षा रक्षकाने चार वर्षाच्या बालिकेवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
बंगळुरू- दिल्लीत पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार व गुरुग्राममध्ये सात वर्षीय प्रद्युम्नच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता बंगळुरूमध्ये शाळेतील सुरक्षा रक्षकाने चार वर्षाच्या बालिकेवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
बंगळुरू येथील एका खासगी शाळेत एलकेजीमध्ये शिकणा-या चार वर्षीय बालिकेने जेव्हा आपल्या गुप्तांगात वेदना होत असल्याचे पालकांना सांगितले, त्यावेळी सदर घृणास्पद प्रकार उजेडात आला. वैद्यकीय तपासणीत या बालिकेवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पीडित बालिकेला उलट्या होऊ लागल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शाळेच्या सर्वच सुरक्षा रक्षकांना ताब्यात घेतले आहे.
शाळेतील पाचपैकी एका सुरक्षा रक्षकाने आपला गुन्हा कबूल केला आहे. बालिकेची प्रकृती पूर्णपणे सुधारल्यानंतर आरोपीची ओळख परेड घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत व सुरक्षिततेची सर्व उपाययोजना करण्यात आली आहे. तरीही ही दुदैवी घटना घडल्याने पालकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
संतप्त पालक आणि स्थानिक रहिवाशांनी शाळेसमोर तीव्र निदर्शने केली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचे समजते.
[EPSB]