हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी तुरुंगातून बारावीची परिक्षा दिली असून ते या परिक्षेत पासही झाले आहे.
चंदिगड- शिक्षणाची आवड असेल तर माणूस कुठेही असो, कसाही असो तो शिक्षण घेतोच. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी तुरुंगातून बारावीची परिक्षा दिली असून ते या परिक्षेत पासही झाले आहे.
चौटाला आणि त्यांचे चिरंजीव अजय यांना शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी १६ जानेवारी २०१३ रोजी १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे ते तिहार तुरूंगात आहेत. शिक्षा भोगत असूनही त्यांनी १२ वीची परिक्षा दिली. या परिक्षेत ते प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत. ओमप्रकाश यांचा छोटा मुलगा आणि हरियाणाचे विरोधी पक्षनेते अभयसिंह चौटाला यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे.
चौटालांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन लर्निंगमधून (एनआयओएस) बारावीचे शिक्षण घेतले. शेवटचा पेपर २३ एप्रिलला होता. त्यावेळी ते पॅरोलवर तुरूंगाबाहेर होते. तर परीक्षा केंद्र हे तुरूंगात होते. त्यामुळे त्यांना परीक्षा देण्यास तुरूंगात जावे लागले, अशी माहिती अभय चौटाला यांनी दिली.