चेंबूर येथील प्रसिद्ध आर. के. स्टुडिओला शनिवारी दुपारी भीषण आग लागली असून स्टुडिओचे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबई- चेंबूर येथील प्रसिद्ध आर. के. स्टुडिओला शनिवारी दुपारी भीषण आग लागली असून स्टुडिओचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अकरा गाडय़ांनी शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले आहे. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी कोटय़वधींचे नुकसान झाले आहे. या आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
स्टुडिओत लागलेली आग मोठी असल्याने सावधगिरी म्हणून व्ही. एन. पुरव मार्गावरील वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली होती. यामुळे चेंबूरहून सायनकडे, तसेच घाटकोपरकडे जाणा-या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. आग आटोक्यात आणण्यात यश आले असून या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. स्टुडिओतील सेटवर असलेल्या डेकोरेशनच्या सामानाला सर्वप्रथम आग लागली.
असे मुख्य अग्निशमन अधिकारी पी. रहांगडे यांनी सांगितले. ‘सुपर डान्सर’ या टीव्ही शोच्या सेटवर ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवार असल्याने सेटवर कुणीही कलाकार वा कर्मचारी नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. इलेक्ट्रीक स्पार्कमुळे आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. सेटसाठी लागणारे प्लायवूड या भागात असल्याने आग झपाटय़ाने पसरली. या भीषण आगीमध्ये स्टुडिओतील सामान जळून खाक झाले आहे. स्टुडिओचे छतदेखील कोसळले आहे. या अग्नितांडवामुळे परिसरात धुराचे मोठ-मोठे लोट पसरले होते. आगीच्या वृत्तावर आर. के. स्टुडिओ व्यवस्थापनाकडून उशिरापर्यंत प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.
आग विझाविण्यासाठी ११ फायर इंजिन, पाच वॉटर टँकर आणि १२ अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. शर्थीच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. स्टुडिओ बिल्डिंगला लागलेल्या आगीत इमारतीतील दोन स्टुडिओंचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
आर. के. चा प्रवास
आर. के. स्टुडिओला लागलेल्या आगीची दृश्य पाहिल्यानंतर संपूर्ण बॉलिवूडच्या काळजात धस्स झाले. ज्या राज कपूर यांच्या नावाने हा स्टुडिओ उभारण्यात आला, त्यांच्यासोबत काम करणा-यांच्या डोळ्यासमोरून आर. के. स्टुडिओचा आतापर्यंतचा प्रवास तरळला. योगायोग म्हणा की आणखी काही, आर. के. स्टुडिओमध्ये चित्रित झालेल्या पहिल्या चित्रपटाचे नावही ‘आग’ होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर दुस-याच वर्षी, म्हणजे १९४८ मध्ये राज कपूर यांनी मुंबईतल्या चेंबूर परिसरात आर. के. स्टुडिओची उभारणी केली. बॉलिवूडमध्ये वर्चस्व राखणा-या कपूर घराण्याशी संबंधित असल्यामुळे आर. के. स्टुडिओला अल्पावधीतच प्रसिद्धी मिळाली. या स्टुडिओत चित्रित झालेले चित्रपट चांगलेच गाजले. त्यातले बहुतांश हे राज कपूर म्हणजे आर. के फिल्मचे होम प्रोडक्शन होते.
१९४८ साली ‘आग’ची निर्मिती केल्यानंतर १९४९ मध्ये आलेला ‘बरसात’, १९५१ मधला ‘आवारा’, १९५३ मधला ‘आह’, असे सुपर डुपर हिट चित्रपट आर. के. प्रोडक्शनने दिले. राज कपूर यांच्या प्रसिद्धीचे वलय असल्यामुळे आर. के. स्टुडिओची यशस्वी घौडदोड सुरू होती. १९५४ मध्ये आलेला ‘बूट पॉलिश’, १९५५ मधला ‘श्री ४२०’, त्यानंतर आलेले ‘जागते रहो’, ‘जिस देश मे गंगा बहती है’ अशा गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती आर. के. स्टुडिओमध्येच झाली. ६० आणि ७० च्या दशकातला ‘संगम’, ‘मेरा नाम जोकर’, ‘कल आज और कल’ आणि ‘बॉबी’सारख्या अनेक चित्रपटांतले महत्त्वाचे सीन आणि गाणी आर. के स्टुडिओमध्येच शूट झाली.
‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘प्रेम रोग’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘हीना’, ‘प्रेमग्रंथ’ अशा सुपर डुपर हिट चित्रपटांच्या निर्मितीमुळे बॉलिवूड वर्तुळात आर. के. फिल्म आणि पयार्याने आर. के स्टुडिओचा दबदबा कायम राहिला. आर. के. स्टुडिओची खासियत म्हणजे इथे शूट होणा-या चित्रपटाचे कॉस्च्युम स्टुडिओमध्ये संग्रहित ठेवले जातात. राज कपूर यांच्या निधनानंतर आर. के. स्टुडिओची सूत्रे रणधीर कपूर यांच्या हातात आली.
सध्या ष्टद्धr(7०)षी कपूर आर. के. स्टुडिओचा कारभार सांभाळत असल्याचे समजते. मुंबईत मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे चित्रपटांशिवाय, लहान-मोठय़ा टीव्ही सिरियल्स आणि रिअॅलिटी शोच्या चित्रिकरणासाठी आर. के स्टुडिओलाच पसंती दिली जाते. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘व्हेन हॅरी मेट सेजल’ या चित्रपटातले काही सीन आर. के. स्टुडिओमध्येच शूट झाले होते. आर. के. स्टुडिओ म्हणजे बॉलिवूडच्या अनेक अमूल्य आठवणींचा साक्षीदार आहे. आगीत आर. के. स्टुडिओचा काही भाग जळून खाक झाला असला तरी या ऐतिहासिक आठवणी अमर आहेत.
[EPSB].
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय खा. राजीव सातव यांनी शनिवारी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली.
[/EPSB]